VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे PA उमेश उईके यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे OSD अनिरुद्ध पालकर यांची भेट; शिक्षकांचे निवेदन सादर,
गडचिरोली, 23 सप्टेंबर 2026::- गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी TET/CTET व TAIT पात्र शिक्षकांना पवित्र पोर्टलच्या सेकंड राऊंडमध्ये समायोजन करून कायम सेवेत सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी कंत्राटी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे PA उमेश उईके यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे OSD अनिरुद्ध पालकर यांची गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.
महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी यांच्या दिनांक 15 जुलै 2024 रोजीच्या आदेशानुसार नियुक्त झालेले हे शिक्षक जिल्ह्यातील अति दुर्गम, नक्षलग्रस्त व अतिमागास भागात अत्यल्प मानधनावर सेवा बजावत आहेत. अनेक वेळा सहा-सहा महिने मानधन न मिळाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतानाही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत आपली सेवा सुरू ठेवली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या शिक्षकांकडे TET/CTET, TAIT तसेच D.Ed./B.Ed. यांसारख्या शैक्षणिक पात्रता असून, अनेक शिक्षकांनी BLO सारख्या निवडणूक जबाबदाऱ्या, मुख्याध्यापक पदाचा कार्यभार, दहावी-बारावी बोर्ड परीक्षेतील पर्यवेक्षक व कस्टडीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. तसेच UDISE Plus, सरल पोर्टल, SQAAF यांसह विविध शासकीय ऑनलाइन पोर्टलवरील कामांचा अनुभव असल्याचेही निवेदनात सांगण्यात आले.
अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शिक्षकविरहित शाळा सांभाळून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी या शिक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नवीन शैक्षणिक धोरण, मूल्यवर्धन, AI कोर्सेस, iGOT कर्मयोगी आदी प्रशिक्षणांसह VINOBA, SAMPARK AI Smart Shala, NIPUN महाराष्ट्र, DIKSHA तसेच डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचे शिक्षकांनी निवेदनात नमूद केले.
यावेळी कंत्राटी TET/CTET व TAIT पात्र शिक्षकांना पवित्र पोर्टलच्या सेकंड राऊंडमध्ये समायोजनाची संधी देऊन त्यांच्या अनुभवाचा व पात्रतेचा विचार करावा आणि कायम सेवेत सामावून घेण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी कंत्राटी शिक्षक अरविंद शेडमाके, रंजित उंदीरवाडे, तिलेश मोहुर्ले, लोकेश बारसागडे आदी उपस्थित होते.
