Thursday, September 24, 2026
HomeChamorshi" BREAKING NEWS" ठाकूरनगरच्या जंगलात वाघाचा थरार; बैल चारणाऱ्या इसमावर जीवघेणा हल्ला...

” BREAKING NEWS” ठाकूरनगरच्या जंगलात वाघाचा थरार; बैल चारणाऱ्या इसमावर जीवघेणा हल्ला…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

वाघाशी झुंज देत गणेश दास यांनी वाचविला जीव; गंभीर जखमी अवस्थेत चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू,

गडचिरोली /चामोर्शी, 24 सप्टेंबर 2026::-तालुक्यातील घोट परिसरालगत असलेल्या ठाकूरनगर येथील जंगलात बैल चारण्यासाठी गेलेल्या ४८ वर्षीय इसमावर वाघाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात गणेश खितीश दास (रा. ठाकूरनगर) हे गंभीर जखमी झाले. वाघाशी झालेल्या झुंजीत प्रसंगावधान राखत त्यांनी आपला जीव वाचविल्याची माहिती आहे.

गणेश दास हे बैल चारण्यासाठी जंगल परिसरात गेले असताना अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातली. यावेळी दास यांनी धैर्याने प्रतिकार केल्याने वाघाच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. मात्र या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या.

घटनेनंतर जखमी गणेश दास यांना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू असून, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रवीण किलनाके यांच्या देखरेखीखाली त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

वन विभागाकडून घटनास्थळाची पाहणी :-

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वाघाच्या हल्ल्यामुळे दास कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले असून, जखमी गणेश दास यांना शासनाच्या नियमानुसार तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

परिसरात तीन-चार वाघांचा वावर असल्याची चर्चा :-

दरम्यान, ठाकूरनगर परिसरातील जंगलात तीन ते चार वाघांचा वावर असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. सुमारे महिनाभरापूर्वी याच परिसरात एका बछड्यावर वाघाने हल्ला केल्याचेही गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढविण्याची मागणी :-

वाघाच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, पशुपालक तसेच जंगल परिसरात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वन विभागाने परिसरात गस्त वाढवून वाघांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे, तसेच ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular