VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
५३ महिला भक्तांच्या वर्षभराच्या श्री साई सच्चरित्र साखळी पारायणाची उत्साहात सांगता,
गडचिरोली /चामोर्शी, 24 सप्टेंबर 2026::-शिर्डीचे साईबाबांनी मानवतेला दिलेला ‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रद्धा व सबुरी’ हा महामंत्र आजही लाखो भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. श्रद्धा, संयम, विश्वास आणि सेवाभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री साई सच्चरित्र साखळी पारायणाचा समारोपीय सोहळा बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी चामोर्शी येथील श्री साई मंदिरात भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.
श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या पुढाकारातून १० जुलै २०२५ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हे साखळी पारायण सुरू होते. चंद्रपूर, गडचिरोली, चामोर्शी, भंडारा आणि मूल परिसरातील ५३ महिला भक्तांनी या आध्यात्मिक उपक्रमात सहभाग घेतला. प्रत्येक गुरुवारी आपल्या निवासस्थानी श्री साई सच्चरित्रातील अध्यायांचे भक्तिभावाने वाचन करून महिलांनी वर्षभर हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला.
सामूहिक वाचन, पूजन व होमहवनाने सांगता :-
पारायणाच्या सांगता सोहळ्यानिमित्त श्री साई मंदिरात श्री साई सच्चरित्राचे सामूहिक वाचन, श्री साई पूजन, होमहवन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ५३ महिला भक्तांनी एकत्र येत साई सच्चरित्राचे सामूहिक वाचन केले. यावेळी साईनामाच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.
साईबाबांच्या श्रद्धा, सबुरी, संयम, विश्वास आणि मानवसेवेच्या विचारांचा जागर या उपक्रमातून करण्यात आला. वर्षभर सुरू असलेल्या या पारायणामुळे सहभागी महिलांमध्ये आध्यात्मिक एकात्मता निर्माण झाली असून, साईबाबांच्या विचारांचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचण्यास मदत झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सांगतेनंतर अन्नदान :-
धार्मिक कार्यक्रमांच्या सांगतेनंतर उपस्थित भाविकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित साईभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाला रवि बोमनवार, अमित यासलवार, मनोज बोमनवार, श्रीरंग नागोसे, बबन वडेट्टीवार, सुरज केलझरकर यांच्यासह साईभक्त आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
‘सच्चरित्र वाचनातून मनःशांतीचा अनुभव’ :-
यावेळी सुरेखा बोमनवार (संतोषवार), ग्रुप प्रमुख, चंद्रपूर म्हणाल्या, “साईबाबांनी जगाला ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा महामंत्र दिला आहे. त्यांच्या सच्चरित्राचे सामूहिक वाचन करण्याची इच्छा होती. त्यासाठी ५३ महिलांना एकत्र करून साखळी पारायण सुरू केले. वर्षभर सातत्याने पारायण करताना मनाला मोठा आनंद आणि समाधान मिळाले. साई सच्चरित्राच्या वाचनातून मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचा अनुभव आला.”
वर्षभर श्रद्धेने सुरू ठेवलेल्या या साखळी पारायणाच्या सांगता सोहळ्यामुळे चामोर्शी परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
