VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
दुर्गम भागातील गुणवंत विद्यार्थिनींचा माजी जि.प. अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सत्कार,
गडचिरोली /भामरागड, 25 सप्टेंबर 2026::-शिक्षणाच्या मर्यादित सोयी-सुविधा, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि विविध अडचणींवर मात करत भामरागड तालुक्यातील आदिवासी समाजातील तीन गुणवंत विद्यार्थिनींनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यापैकी दोन विद्यार्थिनींची NEETच्या माध्यमातून MBBS अभ्यासक्रमासाठी निवड, तर एका विद्यार्थिनीने B.Sc. अभ्यासक्रमासाठी नागपूर येथे प्रवेश मिळवत उच्च शिक्षणाची वाट धरली आहे. या गुणवंत लेकींच्या यशामुळे भामरागड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरीची नोंद झाली आहे.
या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात या गुणवंत लेकींचे अभिनंदन केले.
मलमपोडूरच्या श्रुतीची डॉक्टर होण्याच्या दिशेने झेप :-
मलमपोडूर येथील कु. श्रुती लालसू वडे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत मेहनतीच्या जोरावर NEET परीक्षेत यश मिळवले. तिची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे MBBS अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. छोट्याशा गावातून वैद्यकीय शिक्षणापर्यंत पोहोचलेली श्रुतीची ही कामगिरी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
लाहेरीच्या दीक्षाचीही MBBSसाठी निवड :-
लाहेरी या दुर्गम भागातील कु. दीक्षा बारीकराव कुंजामी हिनेही आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर यश संपादन केले. तिची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथे MBBS अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. दुर्गम भागातून वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने झेप घेणाऱ्या दीक्षाच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रोहिणीची उच्च शिक्षणाकडे वाटचाल :-
कु. रोहिणी राजू कुरसामी हिने B.Sc. अभ्यासक्रमासाठी नागपूर येथे प्रवेश मिळवला असून उच्च शिक्षणाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी रोहिणीचे यशही प्रेरणादायी ठरत आहे.
‘भामरागडच्या मातीत गुणवत्ता कमी नाही, संधीची गरज आहे’ :-
सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना डॉ. अजयभाऊ कंकडालवार म्हणाले की, भामरागडच्या मातीत गुणवत्ता कमी नाही, फक्त विद्यार्थ्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शनाची गरज आहे. आज या तीन लेकींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर हे सिद्ध करून दाखवले आहे. दुर्गम भागातील मुलींनी घेतलेली ही गगनभरारी अत्यंत अभिमानास्पद आहे.
या विद्यार्थिनी भविष्यात डॉक्टर होऊन आपल्या भागातील गोरगरीब आणि आदिवासी बांधवांची सेवा करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पुस्तके, वसतिगृह किंवा इतर कोणत्याही अडचणीच्या काळात आपण व आपले कुटुंब सर्वतोपरी सहकार्य करण्यास सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भामरागड काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रसाद कुड्यामी, तिन्ही विद्यार्थिनींचे आई-वडील, कुटुंबीय, शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्गम आणि आदिवासीबहुल भामरागड तालुक्यातील या तीन लेकींच्या उल्लेखनीय यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्येही उच्च शिक्षणाची नवी उमेद निर्माण झाली असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
