VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव उत्साहात,
आकर्षक सजावट व मनमोहक गणेशमूर्ती ठरते भक्तांचे श्रद्धास्थान,
गडचिरोली /अहेरी, 25 सप्टेंबर 2026::- अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या अहेरी येथील राणी रुक्मिणीदेवी महालात विराजमान झालेला ‘अहेरीचा राजा’ गणराय सध्या अहेरी शहरासह परिसरातील भाविकांच्या श्रद्धेचे आणि आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. गणरायाच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक महालात दाखल होत असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जात आहे.

गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी राजमाता राणी रुक्मिणीदेवी, कुमार अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा यांच्यासह कुटुंबीय, मान्यवर आणि भाविक उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही राणी रुक्मिणीदेवी महालात गणेशोत्सवासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. देखणी व मनमोहक गणेशमूर्ती, आकर्षक विद्युत रोषणाई, कलात्मक सजावट आणि पारंपरिक धार्मिक वातावरण यामुळे महाल परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. गणरायाचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी तसेच दर्शन घेण्यासाठी अहेरी शहरासह आसपासच्या गावांमधूनही भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.
सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी :-

‘अहेरीचा राजा’च्या दर्शनासाठी सकाळपासूनच राणी रुक्मिणीदेवी महालात भाविकांची वर्दळ सुरू असते. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि लहान मुले उत्साहाने गणरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. भाविकांकडून गणरायाच्या चरणी पुष्प, नारळ व नैवेद्य अर्पण करून सुख-समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबाच्या मंगलमय भवितव्यासाठी प्रार्थना केली जात आहे.
भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा संगम :-

गणेशोत्सवाच्या निमित्ताने राणी रुक्मिणीदेवी महाल परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे. गणरायाच्या दर्शनाने भाविकांमध्ये आनंदाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले असून, महाल परिसरात दिवसभर भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
**‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया’**च्या जयघोषाने महाल परिसर दुमदुमून जात असून, ‘अहेरीचा राजा’ भाविकांसाठी गणेशभक्तीचे विशेष श्रद्धास्थान बनला आहे.
