Friday, September 25, 2026
HomeGadchiroliआचारसंहितेचा फटका; गडचिरोलीतील ८ तालुक्यांमधील रोजगार मेळावे स्थगित...

आचारसंहितेचा फटका; गडचिरोलीतील ८ तालुक्यांमधील रोजगार मेळावे स्थगित…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

२९ सप्टेंबरचे नियोजित मेळावे पुढे ढकलले; सुधारित तारीख लवकरच जाहीर होणार,

गडचिरोली, 25 सप्टेंबर 2026::- निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे (प्लेसमेंट ड्राईव्ह) तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. मेळाव्यांची सुधारित तारीख, वेळ आणि ठिकाणाबाबतची माहिती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रा. ना. माटे यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर, औरंगाबाद व पुणे पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गडचिरोली जिल्ह्याचा नागपूर पदवीधर मतदारसंघात समावेश असल्याने जिल्ह्यात आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या अनुषंगाने २९ सप्टेंबर रोजी आयोजित रोजगार मेळावे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आठ ठिकाणचे मेळावे स्थगित :-

स्थगित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांमध्ये शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली; महात्मा गांधी कला, विज्ञान महाविद्यालय, आरमोरी; शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वडसा; शहीद बिरसा मुंडा महाविद्यालय, कोरची; शिवाजी ज्युनिअर कॉलेज, चामोर्शी; शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलापल्ली; भगवंतराव आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, एटापल्ली; तसेच श्री. जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, धानोरा येथील नियोजित मेळाव्यांचा समावेश आहे.

उमेदवारांनी नोंद घ्यावी :-

या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होण्यासाठी तयारी केलेल्या बेरोजगार युवक-युवती, विविध कंपन्या, उद्योजक तसेच आस्थापनांनी सदर बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्यांच्या पुढील आयोजनाची तारीख, वेळ आणि इतर आवश्यक माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आचारसंहितेमुळे रोजगाराच्या संधींसाठी नियोजित असलेल्या या मेळाव्यांना तात्पुरता विराम मिळाला असला तरी, सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी त्याचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular