Friday, September 25, 2026
HomeEtapalliबोडमेट्यात पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा! नळाला बारीक धार; CPIचा प्रशासनाला इशारा...

बोडमेट्यात पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा! नळाला बारीक धार; CPIचा प्रशासनाला इशारा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

जल जीवन मिशनसह जुन्या नळयोजनेची तांत्रिक तपासणी करून तातडीने दुरुस्तीची मागणी,

गडचिरोली /एटापल्ली, 25 सप्टेंबर 2026::- ग्रामपंचायत पुरसलगोंदी अंतर्गत येणाऱ्या बोडमेटा गावात शासनाच्या विविध पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात नागरिकांना पुरेसे आणि नियमित पाणी मिळत नसल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. अनेक घरांमध्ये नळातून पाण्याची अत्यंत बारीक धार येत असून काही ठिकाणी नळ, पाइपलाइन व जोडण्यांमध्ये बिघाड असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) प्रशासनाचे लक्ष वेधत पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तांत्रिक तपासणी करून दोष दूर करण्याची मागणी केली आहे.

बोडमेटा हे DMF क्षेत्र तसेच सुरजागड लोहखदान परिसरातील गाव असून या भागाच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून निधी खर्च केला जात आहे. मात्र, विकासाच्या योजना राबविल्या जात असतानाही नागरिकांना मूलभूत पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने या योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गावात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०२२-२३ मध्ये सौर ऊर्जा आधारित नळ पाणीपुरवठा योजना, तसेच ठक्कर बाप्पा आदिवासी घटक सुधारणा कार्यक्रमांतर्गत सन २०१८-१९ मध्ये नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. मात्र, या योजनांची नियमित देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने अपेक्षित क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कुठे गळती, तर कुठे नळच बंद :-

गावातील अनेक घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचत नसल्याची तक्रार आहे. काही ठिकाणी नळ तुटलेले असून अंतर्गत पाइपलाइनमध्ये गळती असल्याचे सांगण्यात येते. अनेक घरांमध्ये पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने नळातून केवळ बारीक धार येते. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविणेही कठीण होत आहे.

पाणीपुरवठा टाकी, सौर पंप, मोटार, व्हॉल्व्ह तसेच मुख्य व अंतर्गत पाइपलाइनची नियमित देखभाल न झाल्याने संपूर्ण यंत्रणेवर परिणाम झाल्याचा आरोप CPIकडून करण्यात आला आहे.

CPIकडून प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन :-

पाणीपुरवठ्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या बोडमेटा येथील नागरिकांनी आपली समस्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. सचिन मोतकुरवार यांच्यासमोर मांडली. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत कॉ. मोतकुरवार यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, भामरागड येथील प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.

या निवेदनातून दोन्ही पाणीपुरवठा योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण यंत्रणेची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पाइपलाइनपासून सौर पंपापर्यंत तपासणीची मागणी :-

मुख्य व अंतर्गत पाइपलाइनमधील गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करावी, तुटलेले नळ व नळजोडण्या बदलण्यात याव्यात, तसेच ज्या घरांमध्ये कमी दाबाने पाणी येते तेथे पाण्याचा दाब तपासून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच सौर पंप, सोलर यंत्रणा, पाण्याची टाकी, मोटार, व्हॉल्व्ह व इतर उपकरणांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. योजनांच्या कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य, मंजूर निधी आणि प्रत्यक्ष झालेला खर्च यांची तांत्रिक व प्रशासकीय तपासणी करण्याची मागणीही CPIने केली आहे.

“योजना कागदावर नव्हे, प्रत्येक घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत” :-

“पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत प्रश्न आहे. सुरजागड लोहखदान परिसरात असूनही बोडमेटा गावातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल, तर ही गंभीर बाब आहे. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून पाणीपुरवठ्यातील सर्व दोष दूर करावेत,” अशी भूमिका कॉ. सचिन मोतकुरवार यांनी व्यक्त केली.

तसेच पाण्याची गुणवत्ता तपासून नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि नियमित पाणीपुरवठा करावा. भविष्यात योजना बंद पडू नयेत यासाठी कायमस्वरूपी देखभाल-दुरुस्तीची व्यवस्था उभारावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांचा आंदोलनाचा इशारा :-

या मागणीला समर्थन देण्यासाठी बोडमेटा गावातील नागरिक मोठ्या संख्येने CPIच्या माध्यमातून उपस्थित होते. प्रत्येक घरापर्यंत नियमित, पुरेशा दाबाने आणि शुद्ध पाणी पोहोचविण्याची मागणी नागरिकांनी केली.

दरम्यान, प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, गडचिरोली तथा राज्य उपाध्यक्ष, AIYF महाराष्ट्र यांची स्वाक्षरी असून बोडमेटा ग्रामस्थांच्या समर्थनाने ही मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular