VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
धार्मिक व सामाजिक परंपरेचा संगम : शहरात रंगणार गरबा नृत्य,
गडचिरोली, २२ सप्टेंबर २०२५::- ज्या क्षणाची मागील महिनाभरापासून भाविकांना प्रतीक्षा होती. तो क्षण आता जवळ आला आहे. आज २२ सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. बाजारपेठेतही नवरात्रीचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून आली. पोलिस विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात यावर्षी सुमारे ७५० शारदा व दुर्गाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.नवरात्र उत्सवाच्या आगमनाने जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
विधी नुसार देवीची प्रतिष्ठापना:-
परंपरेनुसार विविध ठिकाणी देवीची प्रतिमा किंवा घटस्थापना करून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. गडचिरोली शहरासह ग्रामीण भागातही मंडळांनी भव्य मंडप उभारले असून सजावटीत सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक संदेश देण्याचा प्रयत्न राहणार आहे. अनेक मंडळांनी प्लास्टिकमुक्त व ध्वनी प्रदूषणाचा संकल्प केला आहे. नवरात्री उत्सवाच्या कालावधीत कोणतीही घटना घडू नये, यासाठी पोलिस विभाग सज्ज झाला आहे.
सामाजिक उपक्रमांवर भर:-
ग्रामीण व शहरी भागातील मंडळांनी धार्मिक उपक्रमांबरोबरच मनोरंजनात्मक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात प्रामुख्याने शासकीय योजनांची माहिती, आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर आदी उपक्रमांचा समावेश आहे. मनोरंजनात्मक उपक्रमांवरही विशेष भर दिला जातो.
आरमोरीत अनेक मंडळांनी साकारले मंदिरांचे देखावे:-
नवदुर्गा उत्सव मंडळ (मोटरस्टेंड) तर्फे उज्जैन येथील महाकाल व हरसिद्धी मातेच्या मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे. दुर्गा उत्सव मंडळ (टिळक चौक) तर्फे लोणावळ्यातील आई एकवीरा मंदिराचा देखावा, शारदा उत्सव मंडळ (नेहरू चौक) तर्फे जगन्नाथ पुरीचे जगन्नाथ बाबा देखावा, शारदा उत्सव मंडळ (कुंभारपुरा) तर्फे थ्रीडी जुरासिक पार्क, शास्दा उत्सव मंडळ (सुभाष चौक) तर्फे चंद्रपूरच्या महाकाली मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.
तयारी अंतिम टप्प्यात:-
दुर्गा व शारदा उत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मागील पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे मंडळांनी मंडप, देखावे उभारणीच्या कामाला गती दिली आहे. आता काम अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सोमवारच्या शुभ मुहूर्तावर देवीची प्रतिष्ठापना केली आहे.नऊ दिवस आरमोरी शहराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे. विविध कार्यक्रमांचे नियोजन मंडळांनी केले आहे. नऊ दिवस आरमोरी शहर जणुकाही रात्रंदिवस जागे राहते, अशी स्थिती निर्माण होते. मंडळाचे सदस्य यासाठी परिश्रम घेत आहेत. भाविकांची गर्दी उसळणार आहे.
नवरात्रीच्या साहित्याने सजली बाजारपेठ:-
नवरात्रीच्या कालावधीत अनेक महिला घरीच घटस्थापना करतात. त्यासाठी लागणारे नवग्रह, ओटी, चुनरी, नारळ, आल्ता, कापूर आदी पूजेचे साहित्य खरेदी केले जात.
