Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliमहाआरोग्य सन्मान २०२६ ने गडचिरोलीचा गौरव; चामोर्शी ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा...

महाआरोग्य सन्मान २०२६ ने गडचिरोलीचा गौरव; चामोर्शी ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय सन्मान…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

११७ शस्त्रक्रियांची उल्लेखनीय कामगिरी,

गडचिरोली,२३ फेब्रुवारी २०२६::- राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ चामोर्शी ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील शल्य चिकित्सक डॉ. कृणाल चेंडकापुरे आणि ग्रामीण रुग्णालय, मुलचेरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता साळवे यांना राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात हा गौरव प्रदान करण्यात आला.

जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे कार्यरत असलेले शल्य चिकित्सक डॉ. कृणाल चेंडकापुरे यांनी सन २०२५-२६ या कालावधीत एकूण ११७ हायड्रोसिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून जिल्हा स्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. दुर्गम जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवर यशस्वीपणे पार पाडल्यामुळे रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी झाली असून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या या कार्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया सेवेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेअंतर्गत ग्रामीण रुग्णालय, मुलचेरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता साळवे यांनी माता-बाल आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. उच्च जोखमीच्या गर्भवतींचे व्यवस्थापन, संस्थात्मक प्रसूती वाढविणे, माता व बाल संगोपन सेवा बळकट करणे आणि ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती उपक्रम राबविणे या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाने ग्रामीण भागातील महिलांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविल्या आहेत.

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयालाही संस्थात्मक स्तरावर उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविल्याबद्दल महाआरोग्य सन्मान प्राप्त झाला आहे. बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा, मोठ्या व लहान शस्त्रक्रिया, प्रसूती सेवा (नॉर्मल व सिझेरियन), आपत्कालीन सेवा तसेच ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ अंतर्गत प्रभावी कामगिरी यामुळे रुग्णालयाने दुर्गम भागात गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची काटेकोर अंमलबजावणी आणि जनतेशी असलेला विश्वासाचा संवाद यामुळे या रुग्णालयाने राज्यस्तरावर मानाचे स्थान मिळवले आहे.

संस्थात्मक गौरवासोबत तज्ज्ञ डॉक्टरांची वैयक्तिक कामगिरी यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे मनोबल उंचावले असून हा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. दुर्गम आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीने आरोग्य सेवेच्या माध्यमातून राज्यस्तरावर नवा आदर्श निर्माण केला असून भविष्यातही समर्पित भावनेने आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा संकल्प आरोग्य प्रशासनाने व्यक्त केला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular