Friday, June 5, 2026
HomeGadchiroli‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानात गडचिरोलीचा राज्यस्तरीय गौरव...

‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानात गडचिरोलीचा राज्यस्तरीय गौरव…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

दुर्गम भागातील आरोग्य सेवेची दखल; ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ने जिल्ह्याचा सन्मान,

मुंबई /गडचिरोली,२३ फेब्रुवारी २०२६::- राज्य शासनाच्या वतीने आयोजित ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ व ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गडचिरोली जिल्ह्याचा राज्यस्तरावर विशेष गौरव करण्यात आला. दुर्गम व अतिदुर्गम भागात माता व बाल आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रभावी उपक्रमांची राज्य शासनाने दखल घेतली.

 राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते जिल्ह्याचा विशेष सन्मान करण्यात आला.

( महाआरोग्य सन्मान २०२६ प्राप्त मानकरी )

 डॉ. अमोल कुकुडकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पेरमिली :- 

सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती मोहिमा व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना “महाआरोग्य सन्मान – २०२६” प्रदान करण्यात आला.

श्रीमती पार्वती तिम्मा, आशा स्वयंसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी :- 

अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात घरोघरी भेट देत माता व बाल आरोग्य सेवा सुनिश्चित केल्याबद्दल त्यांचा “महाआरोग्य सन्मान – २०२६” देऊन गौरव करण्यात आला.

‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत राबविण्यात आलेली प्रमुख कार्यवाही :- 

गडचिरोली जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यामागे आरोग्य विभागाची शिस्तबद्ध आणि परिणामकारक कार्यपद्धती आहे.

सर्वंकष आरोग्य तपासणी :- 

दुर्गम भागातील गरोदर माता व किशोरवयीन मुलींची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. हिमोग्लोबिन (Hb), रक्तदाब (BP) आणि इतर आवश्यक चाचण्यांवर विशेष भर देण्यात आला.

 अ‍ॅनिमिया (रक्तक्षय) निर्मूलन मोहिम :- 

महिलांमधील रक्तक्षय कमी करण्यासाठी लोहयुक्त गोळ्यांचे (IFA) वितरण तसेच संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली.

 डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली :- 

प्रत्येक लाभार्थी महिलेची आरोग्य नोंदणी व पाठपुरावा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अचूकपणे करण्यात आला, ज्यामुळे उपचार प्रक्रियेत सातत्य राखता आले.

 समुपदेशन व जनजागृती :- 

आशा स्वयंसेविकांमार्फत ‘माता बैठकां’द्वारे स्तनपान, लसीकरण, स्वच्छता व पोषण याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.

 संस्थात्मक प्रसूतीस प्रोत्साहन :- 

सुरक्षित प्रसूतीसाठी मातांना आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचविण्याच्या उपाययोजनांमुळे संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले.

सदर अभियानासाठी डॉ. स्मिता साळवे व डॉ. प्रेरणा देवतळे यांनी नोडल अधिकारी म्हणून प्रभावी समन्वय साधत जिल्हाभर अभियानाची यशस्वी अंमलबजावणी केली.

श्री. सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली म्हणाले :- 

“गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक स्वरूप आव्हानात्मक असले तरी आरोग्य यंत्रणेने शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवली आहे. ‘स्वस्थ नारी’ हेच ‘सशक्त कुटुंबाचे’ मूळ आहे, हे आपल्या कार्यातून सिद्ध झाले आहे. हा पुरस्कार आपल्या संपूर्ण टीमच्या निष्ठेची पोचपावती आहे.

डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले :- 

“दुर्गम भागातील माता मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करण्याच्या आपल्या संकल्पाला या सन्मानामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे. आरोग्य विभागातील प्रत्येक घटकाने अहोरात्र परिश्रम घेतले आहेत.

या यशामागे जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक तसेच विशेषतः आशा स्वयंसेविकांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या जिद्द, चिकाटी व सेवाभावामुळे गडचिरोली जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर अभिमानाने घेतले जात आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी कळविले आहे .

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular