Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीत टस्कर हत्तीचा पुन्हा कहर...

गडचिरोलीत टस्कर हत्तीचा पुन्हा कहर…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

 मेंढा येथील 38 वर्षीय युवकाला चिरडून ठार,

गडचिरोली ,०९ जुलै २०२६::- चंद्रपूर जिल्ह्यात एका व्यक्तीचा बळी घेतल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या भरकटलेल्या टस्कर हत्तीने पुन्हा एकदा मानवी जीव घेतला आहे. गडचिरोली तालुक्यातील मेंढा–चांदाळा मार्गावर बुधवारी (दि. ८) सायंकाळी सायकलने घरी परतणाऱ्या धनराज मनिराम मडावी (वय ३८, रा. मेंढा) या शेतकरी व विटभट्टी कामगाराला हत्तीने सोंडेने उचलून जमिनीवर आपटत पायाखाली चिरडून ठार केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन्यजीव–मानव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

धनराज मडावी हे काही सहकाऱ्यांसह कामानिमित्त सायकलने चांदाळा येथे गेले होते. सायंकाळी सुमारे ६.३० वाजता काम आटोपून सर्वजण मेंढ्याकडे परतत असताना, मेंढा टोली गावापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर रस्त्यालगत अचानक भरकटलेला टस्कर हत्ती समोर आला.

हत्ती दिसताच सर्वांनी सायकली टाकून जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र धनराज मडावी यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. हत्तीने त्यांचा पाठलाग करून सोंडेने उचलले, जोरात जमिनीवर आपटले आणि त्यानंतर पायाखाली तुडवत जागीच ठार केले. त्यांच्या सहकाऱ्यांनी हा संपूर्ण थरार दूरून पाहिला; मात्र हत्तीच्या भीतीमुळे कोणालाही मदतीसाठी पुढे जाता आले नाही.

घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी भेंडेकर, क्षेत्रसहायक प्रदीप गेडाम यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.

मृत धनराज मडावी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आणि दोन भाऊ असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे मेंढा परिसरात शोककळा पसरली आहे.

विशेष म्हणजे, वन विभागाने बुधवारी सकाळीच चांदाळा परिसरात भरकटलेल्या टस्कर तसेच हत्तींच्या कळपाच्या हालचाली सुरू असल्याचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. अत्यावश्यक कारणाशिवाय जंगलालगतच्या रस्त्यांवर जाणे टाळावे, असेही सांगण्यात आले होते. तरीही ही दुर्दैवी घटना घडल्याने केवळ जनजागृती पुरेशी नसून अशा भागात अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.

यापूर्वी २ जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सोनापूर परिसरात दुचाकीवरून जात असलेल्या अतुल गोहणे (वय ५२) यांचा याच टस्कर हत्तीने बळी घेतला होता. त्यानंतर हा हत्ती गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. अवघ्या आठ दिवसांच्या अंतराने दुसरा बळी गेल्याने वन विभागासमोरील आव्हान अधिक गंभीर बनले असून, या भरकटलेल्या टस्करचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular