Sunday, September 13, 2026
HomeMumbaiगडचिरोलीतील रानटी हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा...

गडचिरोलीतील रानटी हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची मागणी,

महाराष्ट्र /मुंबई, ०९ जुलै २०२६::- गडचिरोली जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आलेल्या रानटी हत्तींचे कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांना जिल्ह्याबाहेर स्थलांतरित करण्यासाठी ठोस व स्थायी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी नमूद केले आहे की, गेल्या काही काळापासून रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागात सतत वावरत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच अनेक गावांमध्ये शिरून घरांची मोडतोड करण्यात आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्तींच्या हल्ल्यात काही निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वन विभागाकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या अपुऱ्या ठरत असून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रानटी हत्तींचे वैज्ञानिक पद्धतीने पुनर्वसन करून त्यांना गडचिरोली जिल्ह्याबाहेर योग्य अधिवासात स्थलांतरित करावे, तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, घरांचे नुकसान व मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने ठोस निर्णय घ्यावा व रानटी हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी पसं उपसभापती विलास दशमुखे, नीरज पटेल आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular