Friday, September 25, 2026
HomeGadchiroliभाजयुमोच्या संघटनात्मक बांधणीला वेग; जिल्ह्यात बूथनिहाय संघटन मजबूत करण्यावर भर...

भाजयुमोच्या संघटनात्मक बांधणीला वेग; जिल्ह्यात बूथनिहाय संघटन मजबूत करण्यावर भर…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, 24 सप्टेंबर 2026::-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, जिल्हा गडचिरोलीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष मधुकर केशव भांडेकर यांच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी काळातील संघटनात्मक कामकाज, ‘सेवा संकल्प’ अभियान तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवक मोर्चाची भूमिका अधिक प्रभावी करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प’ अभियानात भाजयुमोच्या माध्यमातून अधिकाधिक सहभाग नोंदवून विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. युवकांना सामाजिक कार्याशी जोडून सेवा उपक्रमांचा विस्तार करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना मांडल्या.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविणे, संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान करणे आणि बूथनिहाय संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. शहरासोबतच ग्रामीण भागातील युवकांपर्यंत पोहोचून त्यांना संघटनेशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचेही निश्चित करण्यात आले.

प्रत्येक गावात भाजयुमोची कार्यकारिणी उभारण्यावर भर :-

बैठकीत प्रत्येक गावात भाजयुमोची कार्यकारिणी गठीत करण्याबाबतही चर्चा झाली. संघटनेची माहिती, पदाधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क याबाबतचे फलक गावपातळीवर लावण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांनी दिल्या. त्यामुळे संघटनेचे काम अधिक नियोजनबद्ध पद्धतीने तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार आहे.

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांच्या जागी कार्यक्षम कार्यकर्त्यांना संधी :-

संघटनेत पदाची जबाबदारी असतानाही सक्रियपणे काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन, आवश्यकतेनुसार त्यांच्या जागी सक्रिय, कार्यक्षम आणि संघटन वाढीसाठी योगदान देणाऱ्या नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. जिल्हा, शहर आणि तालुका कार्यकारिणी अधिक सक्षम करून संघटनात्मक कामाला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

युवकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेणे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना भाजयुमोशी जोडणे, यासाठी आगामी काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचेही नियोजन करण्यात आले.

बैठकीला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री, जिल्हा उपाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular