Friday, September 25, 2026
HomeBallarshaप्रसूतीदरम्यान नवजात बाळासह महिलेचा मृत्यू; उपचारातील निष्काळजीपणाच्या आरोपाने खळबळ...

प्रसूतीदरम्यान नवजात बाळासह महिलेचा मृत्यू; उपचारातील निष्काळजीपणाच्या आरोपाने खळबळ…

VAINGANGA NEWS 24 / विशेष प्रतिनिधी,

चंद्रपूर /बल्लारपूर, 25 सप्टेंबर 2026::-बल्लारपूर शहरातील एका रुग्णालयात प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळातच महिलेचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर मृत महिलेच्या पतीने संबंधित डॉक्टरांवर उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र, संबंधित डॉक्टरांनी हे आरोप फेटाळून लावत उपचारादरम्यान कोणतीही हलगर्जी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मृत महिलेची ओळख नीलम कुमारी रणधीरकुमार सिंह अशी झाली असून त्यांचे पती रणधीरकुमार सिंह हे लोको पायलट आहेत. मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजता नीलम कुमारी यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पहाटे सुमारे ३ वाजता त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, प्रसूतीदरम्यान नीलम कुमारी यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र, नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर नीलम कुमारी यांची प्रकृती अचानक खालावली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने काही वेळातच त्यांचाही मृत्यू झाला.

पतीचा उपचारातील निष्काळजीपणाचा आरोप :-

मृत महिलेचे पती रणधीरकुमार सिंह यांनी प्रसूतीदरम्यान सुमारे एक तास योग्य उपचार व देखभाल करण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही वेळेत आवश्यक उपचार मिळाले नसल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचा त्यांचा दावा आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

डॉक्टरांकडून आरोप फेटाळले :-

दरम्यान, संबंधित डॉक्टरांनी उपचारात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप स्पष्टपणे फेटाळला आहे. महिलेच्या उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नवजात बाळाला वाचविण्यासाठी चंद्रपूर येथून डॉक्टरांनाही बोलावण्यात आले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच बाळाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर महिलेला मानसिक धक्का बसला आणि त्याचदरम्यान त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

शवविच्छेदन अहवालानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार :-

घटनेनंतर नीलम कुमारी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह बिहारमधील पटना येथे नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

एकीकडे कुटुंबीयांकडून उपचारातील निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे, तर दुसरीकडे डॉक्टरांनी उपचारात कोणतीही हलगर्जी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच या दुर्दैवी घटनेमागील नेमकी वैद्यकीय कारणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular