VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
सुरक्षेच्या कारणास्तव NH-130D वरील वाहतूक बंद; पुलाच्या दोन्ही बाजूंना पोलिसांचा बंदोबस्त,
गडचिरोली /भामरागड, 25 सप्टेंबर 2026::- भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी वाढत असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. १३० डी (NH-130D) वरील पर्लकोटा नदीचा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
पुलावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बॅरिकेटिंग करून नागरिक व वाहनांना पुलाच्या दिशेने जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
पर्लकोटा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ झाल्यास परिसरातील वाहतूक व जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्र, पूल तसेच पाण्याचा प्रवाह असलेल्या धोकादायक ठिकाणी जाऊ नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, पावसाची स्थिती आणि नदीच्या पाणीपातळीवर प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून लक्ष ठेवण्यात येत असून, परिस्थितीनुसार पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत.
