VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण सुविधांची प्रत्यक्ष पाहणी; प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी साधला आदिवासी नागरिकांशी संवाद
गडचिरोली /भामरागड, 25 सप्टेंबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि जंगलव्याप्त भामरागड तालुक्यातील लष्कर व गोपनार या माडिया आदिवासीबहुल गावांना जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी मोटरसायकलने भेट देत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या दौऱ्याचे स्थानिकांकडून स्वागत करण्यात आले.
भामरागड तालुका हा घनदाट जंगल, नदी-नाले आणि डोंगराळ भौगोलिक परिस्थितीमुळे प्रशासनासाठी आव्हानात्मक मानला जातो. पूर्वी नक्षलवादामुळे या भागात प्रशासकीय यंत्रणेची पोहोच मर्यादित होती. मात्र, आता जिल्हा नक्षलमुक्तीच्या दिशेने पुढे जात असताना प्रशासनाने दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यावर भर दिला आहे.
जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी लष्कर व गोपनार येथे पोहोचल्यानंतर माडिया आदिवासी नागरिकांशी संवाद साधला. गावातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, शिक्षणाची स्थिती तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध स्थानिक अडचणींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. केवळ कार्यालयीन अहवालांवर अवलंबून न राहता दुर्गम भागातील परिस्थिती स्वतः पाहून जाणून घेण्याचा प्रयत्न या भेटीतून करण्यात आला.
या दौऱ्यात जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे उपस्थित होते. प्रशासन व पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
जिल्हाधिकारी गावात पोहोचताच माडिया आदिवासी बांधवांनी ‘जय सेवा’ आणि ‘सेवा जोहार’ अशा पारंपरिक अभिवादनाने त्यांचे स्वागत केले. आपल्या गावात प्रथमच जिल्हाधिकारी प्रत्यक्ष आल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांशी आपुलकीने संवाद साधल्याने प्रशासन आपल्यापर्यंत पोहोचत असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली.
लष्कर आणि गोपनारसारख्या अतिदुर्गम गावांना जिल्हास्तरीय प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिल्याने स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गावातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नांना गती मिळेल, तसेच दुर्गम माडिया भागाच्या विकासाला चालना मिळेल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या दौऱ्यामुळे प्रशासन आणि दुर्गम भागातील आदिवासी नागरिक यांच्यातील थेट संवादाला नवी दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
