VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
शारीरिक-मानसिक बदलांसह पॉक्सो कायदा, एचआयव्ही-एड्स व आरोग्यविषयक बाबींवर जनजागृती,
गडचिरोली /चामोर्शी, 25 सप्टेंबर 2026::-राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी यांच्या वतीने यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी आरोग्य मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. किशोरवयात होणाऱ्या शारीरिक, भावनिक व मानसिक बदलांची योग्य माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्याम रामटेके होते. ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथील समुपदेशक नागेश मादेशी यांनी विद्यार्थ्यांना किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, पौष्टिक आहाराचे महत्त्व, प्रजनन व लैंगिक आरोग्य, विविध आजारांची कारणे व लक्षणे, वैद्यकीय उपचार तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी एचआयव्ही/एड्स, त्याचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाय तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून होणाऱ्या आरोग्यविषयक जनजागृतीबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. किशोरवयीन मुला-मुलींनी आपल्या आरोग्याशी संबंधित समस्या लपवून न ठेवता योग्य वेळी पालक, शिक्षक अथवा आरोग्य विभागातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच गरोदरपणातील संभाव्य धोके, लैंगिक हिंसाचार, बालकांचे लैंगिक शोषण आणि त्यापासून संरक्षणासाठी असलेल्या पॉक्सो कायद्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. बालकांवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर परिणाम, सुरक्षित वर्तन, कायदेशीर संरक्षण तसेच किशोरवयीन मुलींसमोरील शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक अडचणी यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान शिक्षक राजू धोडरे उपस्थित होते. तसेच सहाय्यक शिक्षिका दिपाली घोंगडे, लोकनाथ दूधबळे, गुरुदेव सातपुते यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रेमानंद वालदे, प्रवीण नैताम, निलेश क्षिरसागर, जयश्री कोठारे, अमोल उंदिरवाडे, प्रा. प्रदीप भांडेकर, प्रा. प्रवीण गव्हारे, सचिन पिपरे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी लक्ष्मण गव्हारे, माणिक चंद्रागडे, अनिल बोरुले, आशाताई उंदीरवाडे व करुणा उंदिरवाडे यांनी सहकार्य केले.
किशोरवय हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याने या वयातील शारीरिक व मानसिक बदलांविषयी विद्यार्थ्यांना शास्त्रीय आणि योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, सुरक्षितता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
