Friday, September 25, 2026
HomeGadchiroliई-केवायसीसाठी १५ दिवसांची मुदत; अन्यथा धान्य वितरणात अडथळा...

ई-केवायसीसाठी १५ दिवसांची मुदत; अन्यथा धान्य वितरणात अडथळा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, 25 सप्टेंबर 2026::-सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नियमितपणे धान्याचा लाभ मिळणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यातील शिधापत्रिकांवरील पात्र सदस्यांची ई-केवायसी प्रक्रिया येत्या १५ दिवसांत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे तहसीलदार सागर कांबळे यांनी कळविले आहे.

शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी तसेच पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा, यासाठी तालुक्यात ई-केवायसी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया संबंधित रास्त भाव दुकानात ई-पॉस यंत्राद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने करण्यात येत आहे.

शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कुटुंबातील पात्र सदस्यांची ई-केवायसी वेळेत पूर्ण करून घ्यावी. तसेच रास्त भाव दुकानदारांनी लाभार्थ्यांना आवश्यक सहकार्य करून ही प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ई-केवायसी प्रलंबित राहिल्यास पुढील महिन्यापासून धान्याचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी कोणतीही टाळाटाळ न करता जवळच्या रास्त भाव दुकानात जाऊन १५ दिवसांच्या आत ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सागर कांबळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular