VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
बसेस रस्त्यावरच थांबविण्याची वेळ; पावसात विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय — तातडीने बसस्थानक सुरू करण्याची मागणी,
गडचिरोली /चामोर्शी, 25 सप्टेंबर 2026::-तालुक्यातील नवीन बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण होऊनही अद्याप उद्घाटन न झाल्याने ते प्रवासी सेवेसाठी खुले करण्यात आलेले नाही. परिणामी जुन्याच ठिकाणी अथवा मुख्य रस्त्याच्या कडेला बसेस थांबवाव्या लागत असून, प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर झाली असून, नवीन बसस्थानक तयार असताना ते बंद ठेवून प्रशासन नेमके कोणत्या गोष्टीची प्रतीक्षा करत आहे?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बसस्थानक तयार, मात्र प्रवासी सेवेला प्रतीक्षा :-
चामोर्शी शहरातील नवीन बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र उद्घाटन झाले नसल्याने प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीसाठी त्याचा वापर होत नाही. त्यामुळे एसटी बसेस रस्त्याच्या कडेला अथवा जुन्या ठिकाणी थांबतात. यामुळे प्रवाशांची गर्दी, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
विद्यार्थ्यांची सर्वाधिक गैरसोय :-
चामोर्शी तालुका ग्रामीण व आदिवासीबहुल असल्याने परिसरातील अनेक विद्यार्थी दररोज एसटी बसने शाळा व महाविद्यालयात ये-जा करतात. नवीन बसस्थानक बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाऊस आणि उन्हात उघड्यावर बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
मुख्य रस्त्यावर बसेस थांबत असल्याने विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने बस उशिरा येणे किंवा वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
अपघाताची वाट का पाहता? :-
काही दिवसांपूर्वी चामोर्शी-गडचिरोली मार्गावर ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे शालेय विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. अशा घटना वारंवार घडत असताना बसेस सुरक्षित बसस्थानकात न थांबविता मुख्य रस्त्यावर थांबविण्याची वेळ का येत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
यापूर्वीही चामोर्शीतील विद्यार्थ्यांच्या बसच्या प्रश्नावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेतली होती. मात्र नवीन बसस्थानक तयार होऊनही ते अद्याप सुरू न झाल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या :-
नवीन बसस्थानकाचे तातडीने लोकार्पण करून ते प्रवासी सेवेत सुरू करावे, शाळा-महाविद्यालयीन वेळेत जादा बसेस उपलब्ध करून द्याव्यात, बसस्थानक परिसरात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्षाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तसेच, जोपर्यंत नवीन बसस्थानक सुरू होत नाही, तोपर्यंत प्रवाशांसाठी तात्पुरता निवारा, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षित बसथांबा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणीही पुढे आली आहे.
कोट्यवधींच्या सुविधेचा उपयोग कधी? :-
शासनाच्या निधीतून लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून बसस्थानक उभारण्यात आले असताना केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ते बंद राहणे ही बाब नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत आहे. इमारत तयार आहे, सुविधा तयार आहेत; मग प्रवासी सेवा सुरू करण्यास विलंब का? असा थेट प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन नवीन बसस्थानक प्रवाशांसाठी खुले करावे. अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी त्यापूर्वीच प्रशासनाने जबाबदारी पार पाडावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
