VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हात धुण्याचे प्रात्यक्षिक; डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सलग दोन तास पुस्तक वाचनाचा उपक्रम,
चामोर्शी/(मुरखळा माल), 16 ऑक्टोबर 2026::- चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा माल येथे गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जागतिक हात धुवा दिन आणि भारताचे माजी राष्ट्रपती तथा महान शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासोबतच वाचनाची आवड निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
हात धुण्याचे प्रात्यक्षिक; स्वच्छतेचा संदेश :-

जागतिक हात धुवा दिनाचे औचित्य साधून मुरखळा माल येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे मॅडम, आरोग्य परिचारिका कु. बोडावार मॅडम आणि आरोग्य सेवक श्री. सत्यनारायण भांडेकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना हँडवॉश लिक्विडचा वापर करून हात धुण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

हात स्वच्छ धुण्याची योग्य पद्धत, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व आणि स्वच्छतेच्या सवयी दैनंदिन जीवनात अंगीकारण्याची आवश्यकता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छ हातांमुळे अनेक आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते, हा आरोग्यविषयक संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
डॉ. कलाम यांच्या विचारांचा जागर; दोन तास पुस्तक वाचन :-

वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेत सलग दोन तास पुस्तक वाचनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, शिक्षणावरील निष्ठेतून आणि विद्यार्थ्यांविषयीच्या आत्मीयतेतून प्रेरणा घेण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांची आकलनक्षमता वाढावी आणि पुस्तकांशी मैत्री दृढ व्हावी, या उद्देशाने वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती :-

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. धोडरे सर, पदवीधर शिक्षक श्री. गणेश बोईनवार सर, श्री. रघुनाथ भांडेकर सर, सहाय्यक शिक्षक श्री. वेटे सर, श्री. जुवारे सर, श्री. कळाम सर, श्री. कुळसंगे सर, श्री. बावणे सर, तसेच आशा सेविका श्रीमती बुरे मॅडम आणि श्रीमती तुंबडे मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. राशी गजानन बुरांडे हिने केले :-
स्वच्छतेची सवय आणि वाचनाची आवड या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वच्छतेचा संस्कार आणि ज्ञानाची ओढ यांचा सुंदर संगम घडविणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
