Tuesday, October 20, 2026
HomeEtapalliरस्ता नाही, विकास कसा होणार? माडिया आदिम जमातीच्या गावांचा वनवास संपवा...

रस्ता नाही, विकास कसा होणार? माडिया आदिम जमातीच्या गावांचा वनवास संपवा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

कृष्णार फाटा–मिरगुळवांचा–धोबुर या ७ किमी रस्त्याच्या मंजुरीसाठी CPI आक्रमक; रुग्ण, गरोदर महिलांचे हाल थांबविण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा,

गडचिरोली/ एटापल्ली, 20 ऑक्टोबर 2026::- गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आजही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र भामरागड तालुक्यातील कृष्णार फाटा–मिरगुळवांचा–धोबुर या मार्गावरून समोर येत आहे. रस्त्याअभावी माडिया आदिम जमातीच्या नागरिकांना दळणवळणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होते. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत कृष्णार फाटा ते मिरगुळवांचा ते धोबुर हा सुमारे ७ किलोमीटरचा रस्ता तातडीने मंजूर करून बांधकाम सुरू करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे.

रस्त्याअभावी नागरिकांची गैरसोय; पावसाळ्यात प्रवास बनतो जिकिरीचा :-

कृष्णार फाटा ते मिरगुळवांचा हा सुमारे ४ किलोमीटर, तर मिरगुळवांचा ते धोबुर हा सुमारे ३ किलोमीटरचा मार्ग आहे. या मार्गावर योग्य रस्त्याची सुविधा नसल्याने नागरिकांना खराब पायवाटेवरून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात चिखल आणि निसरड्या वाटांमुळे पायी चालणेही कठीण होते. दुचाकी घसरण्याचा धोका कायम असतो, तर जंगलातील वन्यप्राण्यांच्या वावरामुळे रात्रीचा प्रवास अधिक धोकादायक ठरतो.

विकासाच्या गप्पा सुरू असताना दुर्गम भागातील नागरिकांना मात्र रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा मुद्दा या मागणीच्या निमित्ताने पुढे आला आहे.

रस्ता नसल्याने रुग्णांना खाटेवरून न्यावे लागते :-

या परिसरातील सर्वाधिक गंभीर प्रश्न आरोग्य सुविधांशी संबंधित आहे. गावात रस्ता नसल्यामुळे आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी ग्रामस्थांना खाटेवरून किंवा बांबूच्या झोळीच्या साहाय्याने चिखलमय पायवाट पार करावी लागते. रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

गरोदर महिलांना प्रसूतीच्या वेळी रुग्णालयात पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतमालाची वाहतूक आणि बाजारपेठेशी संपर्क यावरही रस्त्याअभावी परिणाम होत आहे. त्यामुळे या मार्गाचे बांधकाम केवळ दळणवळणासाठी नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन जीवनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असल्याचे CPI ने नमूद केले आहे.

PM-JANMAN अभियानातून रस्ता मंजूर करा :-

कृष्णार फाटा–मिरगुळवांचा–धोबुर या दोन्ही मार्गांचा एकत्रित विचार करून सुमारे ७ किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.

सदर रस्त्याच्या प्रस्तावासाठी PM-JANMAN अभियानांतर्गत रस्ते जोडणी घटकात संबंधित गावांची पात्रता तपासून समावेश करावा. तसेच आवश्यकतेनुसार महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी रस्ते विकास योजनेतून निधी उपलब्ध करून रस्त्याचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा :-

दुर्गम भागातील माडिया आदिम जमातीच्या नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत आणि रस्त्याच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू करावी, अशी भूमिका CPI ने घेतली आहे. प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन संबंधित कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

या निवेदनावर CPI गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जक्कुलवार तसेच मिरगुळवांचा व धोबुर येथील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन रस्त्याच्या मंजुरीसाठी ठोस पावले उचलणार का, की दुर्गम भागातील नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular