VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
नागपूर विभागात सर्वाधिक ७२.९५ टक्के मतदान; विभागाच्या सरासरीपेक्षा तब्बल ८.१९ टक्के अधिक,
१३,६०८ पैकी ९,९२७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; पुरुषांचा सहभाग ७५.५५ टक्क्यांवर,
गडचिरोली | २४ ऑक्टोबर २०२६ ::-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्याने मतदानाच्या टक्केवारीत संपूर्ण विभागावर वर्चस्व गाजवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्राप्त अधिकृत अहवालानुसार २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची विक्रमी नोंद झाली. सहाही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद करत गडचिरोलीने लोकशाही प्रक्रियेतील सक्रीय सहभागाची ठळक छाप उमटविली.

जिल्ह्यातील एकूण १३ हजार ६०८ नोंदणीकृत मतदारांपैकी तब्बल ९ हजार ९२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे नागपूर विभागाची एकूण मतदानाची सरासरी ६४.७६ टक्के असताना गडचिरोलीने ती ८.१९ टक्के-बिंदूंनी मागे टाकत विभागात अव्वल स्थान कायम राखले.
पुरुष मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :-

जिल्ह्यातील ९ हजार ३१० पुरुष मतदारांपैकी ७ हजार ३४ जणांनी मतदान केले असून पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ७५.५५ इतकी राहिली. तर ४ हजार २९८ महिला मतदारांपैकी २ हजार ८९३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावत ६७.३१ टक्के सहभाग नोंदविला.
चंद्रपूर दुसऱ्या, नागपूर शेवटच्या क्रमांकावर :-

नागपूर विभागातील इतर जिल्ह्यांच्या मतदानाच्या टक्केवारीत चंद्रपूर (७२.५९%) दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यापाठोपाठ गोंदिया (७१.५३%), वर्धा (६८.३७%), भंडारा (६७.०७%), तर नागपूर (६०.३३%) या सर्वात कमी मतदान झालेल्या जिल्ह्याची नोंद झाली.
विभागातील एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदारांपैकी १ लाख ६५ हजार ५४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे विभागाची सरासरी ६४.७६ टक्के राहिली. या तुलनेत गडचिरोली जिल्ह्याने सर्वाधिक मतदान नोंदवत विभागात आपली ठळक आघाडी सिद्ध केली.
