Friday, October 23, 2026
HomeGadchiroliअतिदुर्गम बिनागुंड्यात पोलिसांची माणुसकीची ‘पूलबांधणी’...

अतिदुर्गम बिनागुंड्यात पोलिसांची माणुसकीची ‘पूलबांधणी’…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

पोलीस आणि ग्रामस्थांचे श्रमदान; ६० मीटर लांबीचा पूल उभारल्याने पावसाळ्यातील दळणवळणाचा प्रश्न सुटणार,

बिनागुंडा ते लाहेरी मार्गावरील नागरिकांना मोठा दिलासा; विद्यार्थ्यांचा शैक्षणिक त्रास आणि रुग्णांच्या प्रवासातील अडथळे दूर होण्यास मदत,

गडचिरोली, 23 ओक्टोबर 2026::- गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात नागरिकांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या मूलभूत समस्यांच्या निराकरणासाठी गडचिरोली पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा गावाजवळील नाल्यामुळे पावसाळ्यात वारंवार खंडित होणारा संपर्क सुरळीत करण्यासाठी पोलीस जवान आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून तब्बल ६० मीटर लांबीचा पूल उभारला आहे. पोलीस मदत केंद्र बिनागुंडा, सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि सी-६० जवानांच्या या समाजाभिमुख उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पावसाळ्यात संपर्क तुटल्याने नागरिकांची गैरसोय :-

बिनागुंडा ते लाहेरी मार्गावर बिनागुंडा गावाजवळ असलेल्या नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीचा मार्ग वारंवार बंद होत होता. परिणामी, परिसरातील नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटत असे. वैद्यकीय मदतीसाठी जाणाऱ्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत होता, तर शालेय विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत होते. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन गडचिरोली पोलीस दलाने प्रत्यक्ष कृतीतून उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.

आठ पाइपच्या साहाय्याने ६० मीटर लांबीचा पूल :-

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली २२ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामभेटीदरम्यान या कामाला मूर्त स्वरूप देण्यात आले. पोलीस मदत केंद्र बिनागुंडा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार, सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि सी-६० पथकातील जवानांनी एक ट्रॅक्टर आणि एका जेसीबी मशीनच्या साहाय्याने आठ पाइप वापरून श्रमदानातून ६० मीटर लांबीचा पूल उभारला.

या पुलामुळे नाल्यामुळे निर्माण होणारा वाहतुकीचा अडथळा दूर होण्यास मदत झाली असून, नागरिकांना ये-जा करणे अधिक सुलभ झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात वैद्यकीय सेवा मिळविणे आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाणे सुलभ होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नेलगुंड्यानंतर बिनागुंड्यातही पोलिसांचा पुढाकार :-

गडचिरोली पोलीस दलाने यापूर्वी १३ सप्टेंबर २०२६ रोजी अतिदुर्गम नेलगुंडा येथेही नागरिकांच्या सहभागातून पूल उभारला होता. त्यानंतर आता बिनागुंडा येथे श्रमदानातून पूल उभारून पोलीस दलाने दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्यांप्रती असलेली संवेदनशीलता पुन्हा अधोरेखित केली आहे.

सुरक्षेसोबतच विकासासाठीही पोलीस कटिबद्ध :-

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला.

यामध्ये पोलीस मदत केंद्र बिनागुंडाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक तुकाराम नलवडे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक यलगंदकर, एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक ए. आर. चांगण, सी-६० चे पोलीस उपनिरीक्षक मनोहर पटले यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.

दुर्गम भागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतल्याने स्थानिकांमध्ये पोलीस दलाविषयी आपुलकीची भावना निर्माण होत आहे. पोलीस दल केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित नसून, जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत विकासासाठीही कटिबद्ध आहे, हा संदेश बिनागुंड्यातील या श्रमदानातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular