VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त; अशोक लेलँड वाहन पोलिसांच्या ताब्यात, पसार चालकाचा शोध सुरू,
गडचिरोली /चामोर्शी, १० नोव्हेंबर 2026: अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात चामोर्शी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २,२५० नग देशी दारूच्या निपा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले अशोक लेलँड वाहन असा एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा करताच चालकाने वाहन रस्त्यावर सोडून शेतातून पळ काढला. त्यामुळे या कारवाईत दारूचा साठा पोलिसांच्या हाती लागला असला, तरी आरोपी चालक अद्याप फरार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.२० ते २ वाजताच्या सुमारास चामोर्शी पोलीस ठाण्याचे पथक भेंडाळा ते रामाळा डांबरी मार्गावर गस्तीवर होते. याचदरम्यान या मार्गावरून अवैध देशी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पंचांना सोबत घेत संबंधित मार्गावर सापळा रचला.
दरम्यान, भेंडाळा गावाकडून रामाळाच्या दिशेने पिवळ्या-पांढऱ्या रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक MH-27-BX-7859 येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहताच चालकाने काही अंतरावर वाहन सोडले आणि शेताच्या दिशेने पळ काढला.
त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली असता चालकाच्या बाजूच्या सीटवर सहा पांढऱ्या चुंगळ्यांमध्ये रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीच्या ९० एमएल क्षमतेच्या एकूण २,२५० प्लास्टिक सीलबंद निपा आढळून आल्या. जप्त दारूची किंमत १ लाख ८० हजार रुपये, तर वाहनाची अंदाजे किंमत २ लाख रुपये असल्याने एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी पोलीस शिपाई धनराज तुमदेव पिटाले यांच्या फिर्यादीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात अप. क्र. ५६८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ), ९८(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार चालकाचा शोध सुरू :-
कारवाईदरम्यान वाहन सोडून पसार झालेल्या चालकाची ओळख पटविण्याचे तसेच त्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुमेध एस. बनसोडे करीत आहेत.
चामोर्शी पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
