Tuesday, November 10, 2026
HomeEtapalliतीन वर्षांपासून रेखनार गाव अंधारात! गुमडीही वीजेविना; महावितरणच्या कारभारावर CPI आक्रमक...

तीन वर्षांपासून रेखनार गाव अंधारात! गुमडीही वीजेविना; महावितरणच्या कारभारावर CPI आक्रमक…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

CPI चा महावितरणला निर्वाणीचा इशारा; १० दिवसांत लेखी माहिती द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार,

गडचिरोली /एटापल्ली, ९ नोव्हेंबर २०२६ :-गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील गावांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव एटापल्ली तालुक्यात समोर आले आहे. ग्रामपंचायत चोकेवाडा अंतर्गत येणाऱ्या रेखनार गावात तब्बल तीन वर्षांपासून वीजपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना अंधारात जीवन जगावे लागत आहे. तर गुमडी गावही अद्याप वीज सुविधेपासून वंचित आहे. आधुनिक युगातही दोन गावांतील नागरिकांना विजेसारख्या मूलभूत सुविधेसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (CPI) पदाधिकाऱ्यांना गावात बोलावून आपली व्यथा मांडली. विशेष म्हणजे, वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पुढाकार घेत निवेदन सादर केले.

रेखनार गावात मागील तीन वर्षांपासून वीज नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. रात्रीच्या वेळी अभ्यास करणे, मोबाईल चार्जिंग, घरगुती कामे तसेच दैनंदिन जीवनातील अनेक गरजा पूर्ण करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिला, लहान मुले, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांचे हाल होत असताना संबंधित यंत्रणेकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दुसरीकडे, गुमडी या आदिवासी गावातही वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना आधुनिक सुविधांपासून दूर राहावे लागत आहे. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना दुर्गम भागातील गावांमध्ये साधा वीजपुरवठाही उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांच्या मागणीची गंभीर दखल घेत CPI च्या वतीने महावितरणच्या एटापल्ली येथील उपकार्यकारी अभियंत्यांना रेखनार आणि गुमडी या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र निवेदने देण्यात आली आहेत. दोन्ही गावांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक विद्युत खांब उभारणे, वीजवाहिन्या टाकणे, ट्रान्सफॉर्मर व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, तसेच तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, दोन्ही गावांच्या वीजपुरवठ्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे की नाही, संबंधित कामाची सद्यस्थिती काय आहे आणि प्रत्यक्ष वीजपुरवठा कधी सुरू होणार, याची स्पष्ट माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः गुमडी गावाच्या निवेदनावर १० दिवसांच्या आत लेखी उत्तर देण्याची मागणी CPI ने केली आहे.

अन्यथा गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन :-

यावेळी CPI गडचिरोली जिल्हा समितीचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी महावितरणला स्पष्ट इशारा देताना सांगितले की, रेखनार गावातील नागरिक मागील तीन वर्षांपासून अंधारात आहेत, तर गुमडी गावालाही अद्याप वीजपुरवठा मिळालेला नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. महावितरणने तातडीने दोन्ही गावांची प्रत्यक्ष पाहणी करून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी. अन्यथा, ग्रामस्थांना सोबत घेऊन भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

आता महावितरण या मागणीची कितपत दखल घेते आणि रेखनार व गुमडी गावातील नागरिकांचा अंधार दूर करण्यासाठी प्रत्यक्षात कधी पावले उचलते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular