VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
परिसरात शोधमोहीम सुरुच,
गडचिरोली, २३ मे २०२५::- गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नुकत्याच उघडलेल्या कवंडे पोलीस स्टेशन परिसरात सुरु करण्यात आलेल्या मोहिमेत चार कट्टर नक्षली ठार झाले. ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.विश्वासार्ह गुप्त माहितीनुसार, कवंडे आणि नेलगुंडा परिसरातून इंद्रावती नदीच्या काठावर नक्षल्यांच्या हालचाली सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सी-60 चे 12 पथके (सुमारे 300 कमांडो) आणि सीआरपीएफच्या तुकड्यांनी संयुक्तपणे मुसळधार पावसात शोधमोहीम सुरु केली.आज सकाळी नदीकाठावर वेढा घालत असताना नक्षल्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. सी-60 कमांडोंनी तत्काळ प्रत्युत्तर देत सुमारे दोन तास चाललेल्या चकमकीत चार नक्षली ठार केले. घटनास्थळी स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल, दोन .303 रायफल्स, एक भरमार, वॉकी टॉकी, नक्षल साहित्य आणि कॅम्पिंग साहित्य जप्त करण्यात आले आहे.
