VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/वडसा, २८ सप्टेंबर २०२५::- (गोलू ठेंगरी):– राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वडसा नगर शाखेचा शताब्दी वर्ष विजयादशमी उत्सव शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी श्री गजानन मंदिर, माता वॉर्ड, वडसा येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात देसाईगंज प्रतिष्ठित व्यवसायिक व समाजसेवक श्री गणेशजी फाफट, प्रमुख वक्ते चंद्रपूर विभाग कार्यवाह श्री सुभाषजी ईटनकर, तालुका संघचालक भाष्कर डाबरे, नगर संघचालक विजय ठकरानी उपस्थित होते. दुपारी ३ ते ४ या वेळेत एकत्रीकरण व पथ संचलनाची तयारी पार पडली.

त्यानंतर दुपारी ४ वाजता श्री गजानन मंदिरापासून पथ संचलन प्रस्थान करून शहरातील विविध मार्गावरून अंतत: श्री गजानन मंदिर येथे समारोप करण्यात आला. संघ स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध गणवेशामध्ये संचलन करून विजयादशमी उत्सवाची शोभा वाढवली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सशस्त्र पूजनाने झाली आणि प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन तसेच मान्यवरांचे विचार झाले. समाजसेवक श्री गणेशजी फाफट यांनी सांगितले की, ‘‘संघ हे आजच्या समाज जीवनात एक समर्थ मूल्यसंस्था आहे. संस्कार, कर्तव्य आणि सेवाभाव रुजविण्यासाठी स्वयंसेवकांनी सदैव पुढाकार घ्यावा.

समाजातील प्रत्येक घटकाचे समावेश होणे आवश्यक आहे. ’’राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चंद्रपूर विभागाचे कार्यवाह प्रमुख वक्ते श्री सुभाषजी ईटनकर यांनी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघ कार्याचा इतिहास, तत्त्वज्ञान आणि समाज बदलाची आवश्यक भूमिका अभ्यासपूर्ण शैलीत पडताळली.

‘‘संघ स्वयंसेवा म्हणजे अनुशासन, राष्ट्रीयत्व, सेवाव्रती जीवन. प्रत्येक युवकाने भारतीय मूल्यांची जपणूक करावी, समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करावे, हीच विजयादशमीची प्रेरणा आहे,’’ असे त्यांनी सांगितले. त्यांनी संघाच्या सेवा प्रकल्प, आपत्ती व्यवस्थापन, समाजसंगठन आणि नव्या पिढीला दिल्या जाणाऱ्या नेतृत्वाच्या संधी यावर विशेष प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थित स्वयंसेवक, स्थानिक नागरिक, युवा वर्ग यांनी एकत्रितपणे देशभक्ती, सामाजिक सलोखा आणि संघ कार्याचा संकल्प घेतला.

