Saturday, September 5, 2026
HomeWadasaहक्कांसाठी एल्गार! ३१ ऑगस्टला वडसा येथे महामोर्चा...

हक्कांसाठी एल्गार! ३१ ऑगस्टला वडसा येथे महामोर्चा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात शेतकरी-कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद होणार,

गडचिरोली /वडसा,२९ ऑगस्ट २०२६::- आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, आदिवासी, निराधार तसेच महागाईने त्रस्त नागरिकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी येत्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी वडसा येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या महामोर्चातून शासनाचे लक्ष जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे वेधण्यात येणार आहे.

हा महामोर्चा आमदार रामदास मसराम यांच्या कार्यालयापासून सुरू होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय, वडसा येथे पोहोचणार आहे. सकाळी १२ वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून आरमोरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत धान बोनस, कर्जमाफी, कृषी निविष्ठांच्या वाढत्या किंमती आणि वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान या प्रमुख मागण्या महामोर्चातून मांडल्या जाणार आहेत. यासोबतच स्मार्ट मीटरचा प्रश्न, OBC जनगणना, शिक्षक भरती, श्रावणबाळ व निराधार योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच वाढती महागाई याकडेही शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.

महागाईचा वाढता भार, शेतीसमोरील संकटे आणि विविध शासकीय योजनांतील अडचणींमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने आवाज उठविण्याचा निर्धार महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

“हक्कासाठी लढूया, अन्यायाविरुद्ध उभे राहूया” या भूमिकेतून आयोजित करण्यात आलेल्या या महामोर्चात शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, आदिवासी, निराधार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महामोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular