VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
महाराष्ट्र/मुंबई, २४ डिसेंबर २०२४::- माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुंबई येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नां सोबतच मागील 2 वर्षांपासून हत्तीने धुमाकूळ घातला असून वाघाने सुद्धा शेकडोच्या जवळपास नागरिकांचा बळी घेतला या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी डॉ. होळी यांनी वनावर आधारित उद्योगांना चालना देणे, वन जमिनीचे पट्टे (अतिक्रमण धारकांना) देण्यात यावे, आदिवासीचें वनावरील हक्क अबाधित ठेवावे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाशी निगडित प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्याबाबत सविस्तर निवेदन वनमंत्र्यांना सादर केले. स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेशी संबंधित प्रश्न, विकासकामांतील अडथळे आणि वनहक्काशी निगडित अडचणी याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी जिल्ह्यात हत्ती व वाघाने धुमाकूळ घातला असून जिल्ह्यात हट्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक हत्तीने नेस्तनाबूत केले आहे. सोबतच काही गावात शिरून घरांचे सुद्धा नुकसान केल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच वाघानेही जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून सरपण आणण्यासाठी जंगलात गेलेल्या नागरिकांनी आपला जीव गमवलेले असल्यामुळे वाघ व हत्तीच्या आतंकामुळे जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती व वाघांपासून माणसाचे व शेतीचे नुकसान झाले त्याचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी आणि वाघाचा व हत्तीचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा डॉक्टर देवराव होळी यांनी केली. सोबतच गडचिरोली जिल्ह्याला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असा प्रस्तावही डॉ. होळी यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर मांडला.
या निवेदनाची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांचे सर्वोत्तम पद्धतीने निवारण करण्याचे आश्वासन दिले. लवकरच गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या भेटीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाशी संबंधित प्रश्न मार्गी लागण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
