VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी,२७ जुलै २०२६::- पूर्व विदर्भाची सांस्कृतिक ओळख असलेली झाडीपट्टी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून हजारो कलाकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारी एक समृद्ध लोककला आहे. या रंगभूमीने अनेक गुणी कलाकार घडवून त्यांना मराठी चित्रपटसृष्टी व व्यावसायिक नाट्यविश्वात स्थान मिळवून दिले आहे. त्यामुळे झाडीपट्टी नाट्यभूमीचे अस्तित्व कायम राखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत आणि कलाकारांना मिळणाऱ्या मानधनात भरीव वाढ करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली.

ओम शिव ओम साई कला रंगभूमीद्वारे संचालित वेदांत नाट्यकला मंच प्रस्तुत ‘लग्नपाठ’ या नव्या नाटकाच्या विमोचन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, धानोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत कोराम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, जावेद खान, नाट्यलेखक पुंडलिक भांडेकर यांच्यासह कलाकार के. रविकुमार, प्रभाकर गडपायले, राज बोबाटे, प्रशांत चौधरी, करण मंगमोडे, प्रफुल भरडकर, किशोर कापगते, प्रफुल किलनाके, तसेच महिला कलाकार लता निंदेकर, सुप्रिया मोटघरे, अश्विनी आणि रेश्मा रंभाळ यांच्यासह मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.

महेंद्र ब्राह्मणवाडे पुढे म्हणाले की, झाडीपट्टी रंगभूमी ही विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाची अमूल्य परंपरा आहे. या कलेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असून अनेकांनी राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र बदलत्या काळात वाढती आर्थिक अडचण, अपुरे मानधन आणि मर्यादित सुविधा यामुळे अनेक कलाकारांना संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने झाडीपट्टी कलाकारांच्या मानधनात वाढ करून त्यांच्या कलाविष्काराला बळ द्यावे, तसेच या लोककलेच्या संवर्धनासाठी विशेष योजना राबवाव्यात.
कार्यक्रमात ‘लग्नपाठ’ या नाटकाच्या संपूर्ण टीमचे कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी नाटकाच्या यशासाठी शुभेच्छा देत झाडीपट्टी रंगभूमीची परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
