Friday, May 22, 2026
HomeGadchiroliगडचिरोली-उमरखेड एसटी बसचा भीषण अपघात : तीन जणांचा मृत्यू...

गडचिरोली-उमरखेड एसटी बसचा भीषण अपघात : तीन जणांचा मृत्यू…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

३० प्रवासी जखमी; माहिती मिळताच मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांची तात्काळ रुग्णालयात धाव,

गडचिरोली,२१ मे २०२६::- गडचिरोली येथून उमरखेडकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा आज गुरुवारी सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील मुरखडा (नवेगांव) गावाजवळ ही दुर्घटना घडली. या दुर्दैवी अपघातात दोन व्यक्तींसह एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाला असून सुमारे ३० प्रवासी जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोलीहून उमरखेडकडे निघालेल्या एसटी बसचे अचानक नियंत्रण सुटल्याने बसने पलटी घेत रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी एकच आक्रोश उसळला. बसमधील महिला, पुरुष व लहान मुले गंभीररीत्या जखमी झाली. या दुर्घटनेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल यांच्या पत्नी देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.तसेच डॉ. जैन सुद्धा होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणातच भीषण अपघात घडला. अपघातानंतर चालक रोहित देशमुख (रा. अकोला) याने पोलिसांना दिलेल्या माहितीत, बससमोर अचानक काही आले होते का हे स्पष्ट आठवत नसल्याचे सांगितले. तर बस कंडक्टर तिकीट वितरणात व्यस्त असल्याने अपघातापूर्वी नेमके काय घडले याची माहिती त्यालाही मिळू शकली नाही.

दरम्यान, परिवहन विभाग व पोलिसांच्या प्राथमिक तपासात अपघातग्रस्त बस नव्या व चांगल्या स्थितीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निष्काळजीपणे वाहन चालविणे किंवा बसचा वेग अधिक असणे, ही अपघातामागील संभाव्य कारणे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी तात्काळ सामान्य रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी प्रत्येक वॉर्डात जाऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली तसेच डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली. गंभीर जखमींना आवश्यक असल्यास तातडीने नागपूर येथे हलवावे व प्रत्येक रुग्णाला जलद आणि योग्य उपचार मिळावेत, अशा सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी डॉ. नेते यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत ग्रामीण भागातील बससेवा अधिक सुरक्षित व सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी बसेसची नियमित तांत्रिक तपासणी, चालकांचे योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थेवर भर देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच या अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. धुर्वे, डॉ. निलकमल मेश्राम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल, सावली भाजपा तालुका अध्यक्ष किशोर वाकुडकर, गुरुदेव भुरसे, तुळशीदास भुरसे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागरिकांकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular