Friday, May 22, 2026
HomeEtapalliवांगेतुरी ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा...

वांगेतुरी ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली भाजपची एकहाती सत्ता,

गडचिरोली /एटापल्ली,२२ मे २०२६::- एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरी ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय संपादन करत प्रथमच ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केली आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण ९ सदस्यीय बॉडीत तब्बल ६ सदस्य भाजपचे निवडून आल्याने गावात भाजपची एकहाती सत्ता निर्माण झाली आहे. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.

गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात भाजप संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. वांगेतुरी गावातही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन जनसंपर्क वाढविला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच गावातील मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी यंदाच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट कौल दिला.

या निवडणुकीत वनिता गोमजी कोवशी यांची सरपंचपदी तर शैला रामसू कोवशी यांची उपसरपंचपदी निवड झाली. तसेच गणेश सोमजी कोरसा, सुरेश रामा कोवशी, अनिता चंदू मटामी आणि अजय मंगू कोरसा हे सदस्य म्हणून विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांचे स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला.विकासाच्या राजकारणाला जनतेने पसंती दिली असून हा विजय सामान्य नागरिकांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली एटापल्ली तालुक्यात भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात विकासकामे, जनसंपर्क आणि शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे केल्यामुळे मतदारांनी भाजपवर विश्वास दाखविल्याचे बोलले जात आहे.

नवीन ग्रामपंचायत प्रशासन गावातील पाणीपुरवठा, रस्ते, वीज, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांवर प्राधान्याने काम करणार असल्याची माहिती विजयी सदस्यांनी दिली. गावातील प्रलंबित विकासकामांना गती देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वांगेतुरी ग्रामपंचायतीतील हा विजय एटापल्ली तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जात असून आगामी काळात ग्रामीण भागात भाजपची पकड आणखी मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular