VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
चारचाकीसह ८.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त,
गडचिरोली,१३ जुलै २०२६::- गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करताना गडचिरोली पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध देशी-विदेशी दारूसह चारचाकी वाहन असा एकूण ₹8 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने 11 जुलै 2026 रोजी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत हिरेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोरेस्टे-चामोर्शी मार्गावर सापळा रचून संशयित चारचाकी वाहनाची तपासणी केली.
तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दारूसह चारचाकी वाहन जप्त केले. या कारवाईत एकूण ₹8.24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
जिल्ह्यात दारूबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस सातत्याने अशा धडक कारवाया करत असून, अवैध दारू विक्री व वाहतुकीत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. स्थानिक नागरिकांनीही अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
