VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम,
गडचिरोली, १९ जुलै २०२६::- सामान्य नागरिकांना महसूल विभागासह विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ चे आयोजन बुधवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन हॉल येथे करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांच्या विविध शासकीय अडचणींचे जागेवरच निराकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवा व प्रमाणपत्रांसह सातबारा, फेरफार, वारस नोंद, उत्पन्न, जात, रहिवासी प्रमाणपत्र आदी बाबींविषयी मार्गदर्शन व आवश्यक प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांसाठी अर्ज करण्यास मदत, तक्रारींचे तत्काळ निराकरण आणि संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शनही उपलब्ध होणार आहे.
शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, सातबारा उतारा तसेच संबंधित कामासाठी आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे व त्यांची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांद्वारे सर्वसामान्यांची शासकीय कामे सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी या महसूल समाधान शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
