VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; आदिवासी समाजात समाधान,
गडचिरोली,१९ जुलै २०२६::- गडचिरोली शहरातील चांदाळा रोडवरील आदिवासी गोटूल भूमीचा तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गोटूलसाठी आवश्यक एक हेक्टर जागेला मंजुरी मिळाल्याने आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोटूल समितीच्या नव्या कार्यकारिणीने हा विषय प्राधान्याने हाती घेत वनहक्क समिती, वन विभाग, नगर परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी सातत्याने समन्वय साधला. त्यानंतर गोटूल भूमीसाठी आवश्यक जागा मंजूर करण्यात आली. वन विभागाने १०० बाय १०० मीटर जागेचे सीमांकन पूर्ण केल्यानंतर भूमीचे सीमांकन व खांब उभारणीचा कार्यक्रम आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला नगर परिषदेचे सभापती हर्षल गेडाम, गोटूल समितीचे अध्यक्ष नंदू नरोटे, कोषाध्यक्ष अमरसिंग गेडाम, सचिव देवराव अलाम, उपमुख्य कार्यपालन अधिकारी फरेद्र कुर्तीकर, काँग्रेसचे आदिवासी जिल्हाध्यक्ष माधव गावळ, एमएलईडी फाउंडेशनचे जिल्हा सचिव सदानंद ताराम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजित कोवासे, आनंद कंगाळे, उमेश उईके, आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष कृणाल कोवे, बालकु मडावी, सुमित कुमरे, विलास नरोटे तसेच विविध सामाजिक, राजकीय व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गोटूल हे आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे आणि परंपरेचे महत्त्वपूर्ण केंद्र असल्याचे सांगत या भूमीचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
तब्बल ३५ वर्षांच्या संघर्षानंतर गोटूल भूमीचा प्रश्न निकाली निघाल्याने हा आदिवासी समाजाच्या अस्मितेचा ऐतिहासिक विजय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे गोटूलच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी नवे पर्व सुरू होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
