Tuesday, July 28, 2026
HomeEtapalliसुरजागड परिसरात ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद; वन विभागाच्या निरीक्षणाला दुजोरा...

सुरजागड परिसरात ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद; वन विभागाच्या निरीक्षणाला दुजोरा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/एटापल्ली,१९ जुलै २०२६::- एटापल्ली तालुक्यातील कसनसूर वनपरिक्षेत्रातील सुरजागड परिसरात वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघाचे स्पष्ट छायाचित्र कैद झाले असून, या भागात वाघाचा वावर असल्याच्या चर्चेला यामुळे अधिकृत दुजोरा मिळाला आहे. याच कॅमेऱ्यात तेंदुआचाही वावर नोंदविण्यात आल्याने परिसरातील वन्यजीवांची उपस्थिती अधिक ठळक झाली आहे.

मागील आठवड्यात सलगा परिसरात चार पाळीव पशूंवर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटनांनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर वन विभागाने घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे बसवून निरीक्षण सुरू केले. या निरीक्षणादरम्यान वाघाची स्पष्ट नोंद झाल्याने परिसरात मोठा नर वाघ फिरत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

सुरजागड, चंद्रखंडी आणि परिसरातील गावांमध्ये यापूर्वीही ग्रामस्थांनी वाघ दिसल्याचा दावा केला होता. आता ट्रॅप कॅमेऱ्यातील नोंदीमुळे या दाव्याला अधिक बळ मिळाले आहे. मात्र, हा वाघ या भागात कायमस्वरूपी वास्तव्यास आहे की स्थलांतरित असून अधूनमधून ये-जा करतो, याबाबत अद्याप निश्चित निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.

वन विभागाने या संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून पुढील काही दिवस निरीक्षण अधिक तीव्र करण्यात येणार आहे. नागरिकांनी जंगलालगतच्या भागात जाताना सतर्कता बाळगावी, एकटे फिरणे टाळावे तसेच कोणताही वन्यप्राणी आढळल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वन विभागाच्या मते, ट्रॅप कॅमेऱ्यातील नोंदी पुढील अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून त्याआधारे वाघाच्या हालचाली, अधिवास आणि संवर्धनासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. वन्यजीव आणि नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular