VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गोंदिया/तिरोडा,१९ जुलै २०२६::- तिरोडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील डेकोरेशन व केटरिंगचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी तब्बल १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तिरोडा नगराध्यक्षासह एका खासगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, लाचेची मागणी तोंडी न करता तक्रारदाराच्या हातावरच रक्कम लिहून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अशोक रामजीबाबू असाटी (नगराध्यक्ष, तिरोडा) आणि कैलास किसन वाघमारे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नगराध्यक्ष असाटी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
२५ लाखांहून अधिकचे थकीत बिल :-
तक्रारदार हे डेकोरेशन व केटरिंग व्यवसायिक असून त्यांनी तिरोडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ दरम्यान सेवा पुरवली होती. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘हर्षल केटरिंग’च्या नावाने ७.७२ लाख रुपये आणि ‘उज्वला डेकोरेशन’च्या नावाने १७.५० लाख रुपये, असे एकूण २५.२२ लाख रुपयांचे बिल नगरपरिषदेकडे सादर केले होते.
हातावरच लिहिली लाचेची रक्कम :-
२१ मे २०२६ रोजी बिल मंजुरीसाठी नगराध्यक्षांची भेट घेतली असता, त्यांनी कोणतेही शब्द न उच्चारता तक्रारदाराच्या उजव्या हातावर “३ लाख २० हजार” अशी रक्कम लिहून लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. लाच मागण्याची ही अनोखी पद्धत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
एसीबीकडे तक्रार, पडताळणीत मागणी सिद्ध :-
लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने ७ जून रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. ८ जून रोजी पंचांसमक्ष पडताळणीदरम्यान नगराध्यक्षांनी ६ लाख रुपयांचा धनादेश देण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम त्यांच्या पीएकडे देण्यास सांगण्यात आली होती. त्यानंतर ९ जून रोजी एसीबीने सापळा रचला; मात्र संशय आल्याने आरोपींनी रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली.
अखेर गुन्हा दाखल :-
लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतरही रक्कम स्वीकारली नसल्याने एसीबीचे पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या फिर्यादीवरून १८ जुलै रोजी तिरोडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
एसीबीची धडक कारवाई :-
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार चंद्रकांत करपे, हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर, दीपक बाटबर्वे आणि महिला पोलीस शिपाई रोहिणी डांगे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
या प्रकरणामुळे तिरोडा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, लाच मागण्याच्या या आगळ्यावेगळ्या पद्धतीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
