VVAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
गडचिरोली/एटापल्ली,२१ जुलै २०२६::६ भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) ने कॉम्रेड सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे आयोजित संसद भवन मार्चला जाहीर पाठिंबा देत देशातील शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि वारंवार घडणाऱ्या पेपर लीक प्रकरणांविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यामध्ये जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलन व उपोषणाची केंद्र सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देशात वारंवार घडणाऱ्या पेपर लीकच्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली असून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात सापडले आहे. विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून या गंभीर प्रश्नाकडे केंद्र सरकारने अधिक जबाबदारीने पाहण्याची गरज असल्याचे पक्षाने नमूद केले आहे.
तसेच शिक्षण क्षेत्रातील वाढत्या अनियमितता, भ्रष्टाचार आणि परीक्षांमधील कथित गैरव्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यात संबंधित मंत्रालय अपयशी ठरल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “देशातील शिक्षण व्यवस्था गंभीर संकटात सापडली आहे. वारंवार होणारे पेपर लीक हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेले मोठे अन्याय आहे. केंद्र सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्यभर आणि देशभर व्यापक जनआंदोलन उभारेल.”
या निवेदन सादरीकरणावेळी कॉ. सुरज जक्कुलवार (जिल्हा सदस्य, CPI), पक्षाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
