VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
सुपीक जमिनींचे अधिग्रहण थांबविण्याची ठाम मागणी,
नवी दिल्ली,०४ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित एमआयडीसी, विमानतळ व इतर औद्योगिक प्रकल्पांसाठी सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण करण्याच्या प्रक्रियेविरोधात आता शेतकऱ्यांनी थेट देशाच्या उपराष्ट्रपतींपर्यंत धाव घेतली आहे. महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली सहा खासदारांच्या शिष्टमंडळासमवेत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची नवी दिल्लीत भेट घेऊन जिल्ह्यातील कोणत्याही प्रकल्पासाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करू नयेत, अशी ठाम मागणी केली.

शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींसमोर मांडलेल्या निवेदनात गडचिरोलीला ‘स्टील हब’ बनविण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर शेतीजमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. शेती हाच हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा आधार असून जमिनी गेल्यास शेतकरी भूमिहीन होण्यासह त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर–गुरुवळा परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाला तसेच चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावे आणि जयरामपूर परिसरातील १३ गावांमध्ये प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या अधिग्रहण प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

शेतकऱ्यांनी यापूर्वी निवेदने, मोर्चे, आंदोलन तसेच मुंडन आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले होते. याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडेही निवेदन देऊन अधिग्रहणाचे आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही समाधानकारक निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी थेट उपराष्ट्रपतींची भेट घेत न्यायाची मागणी केली.
शिष्टमंडळाने गडचिरोली हा पेसा क्षेत्रात येत असल्याने ग्रामसभांना विशेष अधिकार असल्याचे स्पष्ट केले. ग्रामसभांचा ठाम विरोध असतानाही जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू ठेवली जात असल्याने हा पेसा कायद्याच्या भावनेचा भंग असल्याचा आरोप करत या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, वर्षा गायकवाड, श्यामकुमार बर्वे, प्रशांत पडोळे, गोवाल पाडवी व सलंग ए. सदमा यांची उपस्थिती होती.
महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मनोहर पोरेटी, ॲड. दुष्यन्त कीरसान, दिवाकर निसार, प्रमोद भगत, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, वसंत राऊत, राजेश ठाकूर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, धिवरू मेश्राम, विकास जेंगठे, मारुती कांबळे, रवी बोदलकर, निकेश तुंकलवार, साईनाथ चलाख, सुनील कोहपरे, भक्तदास भगत, मनोज दहेलकर, गुरुदास ठुसे, वसंत बुर्णवार, तात्याजी चिचघरे, गुरुदास ठाकरे, विजय निकुरे, विजय लाड, नदीम नाथानी, विपुल एलटीवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.
