VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
नवीन टाटा कंपनीच्या मार्कोपोलो बसच्या धडकेत ५५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू,
गडचिरोली /सिरोंचा,०३ ऑगस्ट २०२६::- सिरोंचा तालुक्यातील कारसपल्ली गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात ५५ वर्षीय शेतकरी शंकर लस्मैय्या हरी यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे कारसपल्ली परिसरात शोककळा पसरली असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, लखनऊहून चेन्नईकडे नव्याने तयार करण्यात आलेली टाटा कंपनीची मार्कोपोलो बस नेली जात होती. बसमध्ये कोणतेही प्रवासी नसून चालक एकटाच वाहन चालवत होता. याचवेळी शेतातील काम आटोपून घरी परतत असलेल्या शंकर हरी यांना भरधाव बसने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात बसच्या पुढील भागाचेही नुकसान झाले.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू करत शंकर हरी यांना ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. माहिती मिळताच सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. बसचा वेग, चालकाची निष्काळजीपणा आणि अपघाताचे नेमके कारण याचा तपास पोलीस करीत आहेत.
मृत शंकर लस्मैय्या हरी हे कष्टाळू व मेहनती शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, मृताच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी तसेच अपघाताची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
