Wednesday, August 5, 2026
HomeChamorshiएमआयडीसीच्या प्रस्तावित भूमी संपादनाविरोधात १४ गावांतील शेतकऱ्यांचा विराट एल्गार...

एमआयडीसीच्या प्रस्तावित भूमी संपादनाविरोधात १४ गावांतील शेतकऱ्यांचा विराट एल्गार…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

हजारोंच्या उपस्थितीत शांततामय पदयात्रा; “जमीन वाचवा,

गडचिरोली/चामोर्शी,०४ ऑगस्ट २०२६::- एमआयडीसीच्या प्रस्तावित भूमी संपादनाविरोधात चामोर्शी तालुक्यातील १४ गावांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) अभूतपूर्व एकजूट दाखवत हजारोंच्या उपस्थितीत भव्य शांततामय पदयात्रा काढली. शेतकरी कृती समिती (जैरामपूर–येनापूर परिसर) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सरकारच्या भूमी संपादन धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

सकाळी ११ वाजता लक्ष्मणपूर येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. लक्ष्मणपूर–दुर्गापूर–किष्टापूर–चित्तरंजनपूर मार्गे येनापूरपर्यंत संविधानिक आणि अहिंसक मार्गाने ही पदयात्रा काढण्यात आली. “जमीन वाचवा – भविष्य वाचवा”, “शेती आमचा श्वास, जमीन आमचा विश्वास” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांचा उत्साह, शिस्त आणि निर्धार विशेष लक्षवेधी ठरला.

येनापूर मंडळ कार्यालयात पदयात्रेची सांगता झाली. त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार प्रशांत घोरूडे यांना निवेदन देत प्रस्तावित भूमी संपादन तातडीने रद्द करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

या पदयात्रेत जैरामपूर, मुधोली चक क्र. २, मुधोली तुकूम, चित्तरंजनपूर, किष्टापूर, येनापूर, दुर्गापूर, सेलूर, लक्ष्मणपूर, गणपूर, विठ्ठलपूर, यादवपल्ली, पारडीदेवसह परिसरातील अनेक गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हजारोंच्या उपस्थितीमुळे या आंदोलनाने जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले.

यावेळी शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सुपीक शेतीजमीन ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, आमचे अस्तित्व आणि भावी पिढ्यांचे भविष्य आहे. विकासाच्या नावाखाली आमच्या जमिनी हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. लोकशाही आणि संविधानिक मार्गाने आमचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल.”

या विराट पदयात्रेतून शेतकऱ्यांनी सरकार आणि प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला की, शेतकऱ्यांच्या हिताला डावलून होणारा कोणताही विकास स्वीकारला जाणार नाही. हक्काच्या जमिनीच्या संरक्षणासाठी संघर्ष शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular