VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
कर्तव्य कक्ष गणेशोत्सवाचा उपक्रम; नेत्र-दंत तपासणीसह रोगनिदानाची सुविधा,
गडचिरोली, 20 सप्टेंबर 2026::- गणेशोत्सवाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कर्तव्य कक्ष गणेशोत्सवाच्या वतीने रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी, दंत तपासणी तसेच विविध आजारांचे रोगनिदान करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या वयानुसार विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. डोळ्यांचे विकार, दातांच्या समस्या तसेच इतर आजारांचे वेळीच निदान व्हावे आणि नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात नेत्र चिकित्सक म्हणून डॉ. अद्वय अप्पलवार, तर दंत चिकित्सक म्हणून डॉ. धम्मदीप बोदेले ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करणार आहेत. दैनंदिन जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, तसेच आवश्यक तपासण्या करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत या उपक्रमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
हे आरोग्य शिबिर रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत आमदार डॉ. मिलिंद सगुणाबाई नरोटे यांच्या पोटेगाव बायपास रोड, गडचिरोली येथील कार्यालयातील कर्तव्य कक्ष गणेशोत्सव येथे आयोजित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी या विशेष आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन नेत्र व दंत तपासणीसह रोगनिदान सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे नम्र आवाहन आयोजक कर्तव्य कक्ष गणेशोत्सव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
