Friday, October 23, 2026
HomeKurakhedaशिरपूरच्या गोपाळकाल्यात डॉ. अशोक नेते यांची उपस्थिती; धार्मिक उत्सवांतून संस्कारांची रुजवणूक...

शिरपूरच्या गोपाळकाल्यात डॉ. अशोक नेते यांची उपस्थिती; धार्मिक उत्सवांतून संस्कारांची रुजवणूक…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

कुरखेडा व शिरपूर येथील दुर्गोत्सवात घेतले दुर्गामातेचे दर्शन; पदवीधर मतदारांशी साधला संवाद,

गडचिरोली /कुरखेडा, २१ ऑक्टोबर २०२६ ::-आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजमन सुदृढ ठेवण्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अशा उत्सवांच्या माध्यमातून समाजात चांगले आचार, सकारात्मक विचार आणि सुसंस्कारांची रुजवणूक होते. धार्मिक उत्सव हे केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे प्रभावी माध्यम आहेत, असे प्रतिपादन गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी केले.

कुरखेडा येथील शास्त्री चौक (गांधी वार्ड) सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ तसेच शिरपूर येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित दुर्गोत्सव आणि गोपाळकाला कार्यक्रमात डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी पारंपरिक उत्साहात गोपाळकाला फोडून दुर्गामातेचे दर्शन घेतले. तसेच उपस्थित भाविक आणि नागरिकांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

धार्मिक उत्सवांतून नव्या पिढीवर संस्कारांची शिदोरी :-

शिरपूर येथील गोपाळकाला उत्सवाच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. नेते यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे महत्त्व अधोरेखित केले. शिरपूर येथील गोपाळकाला उत्सवाशी आपले जिव्हाळ्याचे नाते असून, येथील नागरिकांचे प्रेम, उत्सवातील उत्साह आणि दुर्गामातेप्रती असलेली श्रद्धा आपल्याला नेहमीच आकर्षित करते, असे त्यांनी सांगितले.

दुर्गामातेच्या चरणी नतमस्तक होऊन परिसरातील सर्व नागरिकांचे जीवन सुखी, समृद्ध आणि सुजलाम्-सुफलाम् व्हावे, अशी प्रार्थना केल्याचेही त्यांनी नमूद केले.

धार्मिक उत्सवांमुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होते. सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत होण्यासोबतच परस्परांतील प्रेम, आपुलकी आणि बंधुभाव वाढण्यास मदत होते. त्यामुळे अशा उत्सवांचे आयोजन करताना सामाजिक एकात्मता आणि संस्कारांचे महत्त्व जपणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पदवीधर मतदारांशी संवाद; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा :-

धार्मिक कार्यक्रमांसोबतच डॉ. अशोकजी नेते यांनी दौऱ्यादरम्यान पदवीधर मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारांच्या अपेक्षा, समस्या आणि विविध प्रश्न जाणून घेतले. आगामी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली. तसेच मतदानासाठी आवश्यक असलेल्या बॅलेट पेपर आणि मतदान पद्धतीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकरजी विठ्ठलराव कोहळे यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन डॉ. अशोकजी नेते यांनी पदवीधर मतदारांना केले. पदवीधरांचे प्रश्न आणि अपेक्षा प्रभावीपणे मांडण्यासाठी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांची उपस्थिती :-

या प्रसंगी माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे, भाजप तालुकाध्यक्ष चांगदेवजी फाये, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ शिरपूरचे अध्यक्ष रमेश बावनथडे, जानबाजी दुमाने, गजानन सयाम, ओबीसी नेते रवींद्र गोटेफोडे, सावसाकडेजी, विनोद नागपुरकर, विस्तारक बळी सर, लीना कोकोडे, उल्हास देशमुख यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, दुर्गा उत्सव मंडळांचे पदाधिकारी, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा संगम घडविणाऱ्या या उत्सवांमुळे कुरखेडा व शिरपूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उत्सवाच्या माध्यमातून परंपरा जपण्यासोबतच सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular