VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
आजाद समाज पार्टीचा स्तुत्य पुढाकार; सामाजिक बांधिलकी जपत महापुरुषांच्या विचारांना अभिवादन,
गडचिरोली /चामोर्शी, 22 ऑक्टोबर 2026::-आजाद समाज पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आजाद समाज पार्टीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या उपक्रमातून रुग्णांप्रती संवेदनशीलता व्यक्त करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
वाढदिवस आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून समाजातील गरजू आणि रुग्णांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. महापुरुषांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजहिताचे कार्य करणे, गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेणे आणि सामाजिक समतेची भावना वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
सेवाभावातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश :-
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करण्यात आली. सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत पोहोचण्याचा आजाद समाज पार्टीचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
यावेळी आजाद समाज पार्टीचे जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, युवा तालुका अध्यक्ष प्रतीक खोब्रागडे, तालुका सचिव आकाश दुर्गे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गामावर, करण पोरटे, साहिल दिकोंडावर यांच्यासह चामोर्शी तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमातून साजरा करत रुग्णसेवेचा व मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
— प्रकाश बन्सोड
जिल्हा सचिव, आजाद समाज पार्टी, गडचिरोली
