Wednesday, November 11, 2026
HomeGadchiroliबिरसा मुंडा जयंतीचा राज्यभर जागर; जनजातीय गौरव सप्ताहासाठी भाजप सज्ज...

बिरसा मुंडा जयंतीचा राज्यभर जागर; जनजातीय गौरव सप्ताहासाठी भाजप सज्ज…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान गडचिरोलीत विविध कार्यक्रमांची रेलचेल; आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास आणि संस्कृती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प – डॉ. देवराव होळी,

गडचिरोली, 11 नोव्हेंबर 2026::-भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिनाचा उत्सव राज्यभर भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि समृद्ध परंपरा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

या संदर्भात गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यभरातील जनतेने भगवान बिरसा मुंडा जयंती आणि जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, ST मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, राज्य परिषद सदस्य डॉ. चंदा कोडवते, ओमकार मडावी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. देवराव होळी म्हणाले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत देशभरात जनजातीय गौरव दिन सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. आदिवासी समाजातील महान स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, त्यांचा संघर्ष, ऐतिहासिक वारसा, संस्कृती आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला देणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे.

या सप्ताहांतर्गत ११ व १२ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदा, १३ नोव्हेंबर रोजी जनजागृती कार्यक्रम, १४ नोव्हेंबर रोजी महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता मोहीम, तर १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. तसेच १६, १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष हा केवळ एका समाजाचा इतिहास नसून तो संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. अन्यायाविरुद्धचा त्यांचा लढा, स्वाभिमानाची भूमिका आणि देशासाठी केलेला त्याग आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे जनजातीय गौरव दिनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शौर्याची, त्यागाची आणि ऐतिहासिक योगदानाची ओळख व्यापक स्तरावर करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डॉ. होळी यांनी स्पष्ट केले.

या सप्ताहातील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होणार असून, या उपक्रमांचा उद्देश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार बांधवांनीही सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. देवराव होळी यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular