Sunday, November 15, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीत जनजातीय गौरव दिनाचा भव्य सोहळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती...

गडचिरोलीत जनजातीय गौरव दिनाचा भव्य सोहळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्तरावरील आयोजन; आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे विशेष प्रदर्शन,

जिल्हा क्रीडा संकुलातील प्रशासकीय इमारत, व्यायामशाळा व बॅडमिंटन हॉलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण,

गडचिरोली, 15 नोव्हेंबर 2026 :-भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त शनिवारी (१५ नोव्हेंबर) गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे.

या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, केंद्रीय जनजातीय कार्यमंत्री जुएल ओराम, केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री दुर्गादास उईके, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास राज्यमंत्री निलय नाईक, गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी संस्कृतीचे विशेष प्रदर्शन ठरले आकर्षण :-

कार्यक्रमस्थळी आदिवासी समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणारे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची जीवनशैली, पारंपरिक श्रद्धा, रूढी-परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा मांडण्यात आला आहे. उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी करून आदिवासी संस्कृतीच्या विविध पैलूंची माहिती जाणून घेतली.

क्रीडा सुविधांना मिळाली नवी बळकटी :-

याच कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलातील प्रशासकीय इमारत, व्यायामशाळा आणि बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण करण्यात आले. या सुविधांमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना सरावासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून, स्थानिक क्रीडा क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करत आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती आणि अस्मिता यांचा गौरव करणारा हा सोहळा गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular