Sunday, September 13, 2026
HomeGadchiroli“लोक नृत्य भारत भारती” महोत्सवाचा शुभारंभ...

“लोक नृत्य भारत भारती” महोत्सवाचा शुभारंभ…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, ०२ मार्च २०२५::- दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, संस्कृति मंत्रालय, भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ ते ३ मार्च २०२५ दरम्यान दररोज सायं. ६.३० वाजता “लोक नृत्य भारत भारती” या महोत्सवाचे आयोजन विद्याभारती कन्या हायस्कूल, गडचिरोली येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी विद्याभारती कन्या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोलीचे संस्थापक श्री. राजाभाऊ मुनघाटे, गडचिरोलीचे माजी आमदार नामदेव उसेंडी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. सचिन मडावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे सहायक संचालक (कार्यक्रम) श्री. दीपक कुलकर्णी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई, नागपूर विभागाचे सहायक संचालक श्री. संदीप शेंडे उपस्थित होते.महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी/कोळी नृत्य, मध्य प्रदेशातील बधाई/नोरता, राजस्थानचे रंगीले नृत्य कालबेलिया/भवाई/चरी, हरियाणाचे घूमर/फाग नृत्य, गुजरातचे जोशपूर्ण सिद्धी धमाल नृत्य, ओडिशाचे संबलपुरी/दालखाई नृत्य आणि छत्तीसगडचे कर्मा नृत्य अशा विविध लोकनृत्यांचे रंगारंग सादरीकरण करण्यात आले.

प्रथम दिवशी महोत्सवात मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. कलाकारांच्या अप्रतिम नृत्यप्रस्तुतींना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.हा कार्यक्रम संस्कृति मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारला जात असून, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे (भा. प्र. से.) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईचे संचालक श्री. विभीषण चवरे आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांच्या नियोजनात आयोजित करण्यात आला आहे.

भारतातील विविध संस्कृती आणि कला जतन करण्यासाठी तसेच नवीन पिढीला त्याची माहिती मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक लोककला आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला जात आहे.या महोत्सवाच्या आयोजनासाठी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे. अधिकाधिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular