VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
लोकप्रतिनिधी म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा,
गडचिरोली /एटापल्ली, २५ जून २०२५::- नगरपंचायत क्षेत्रात शहरी शेतकऱ्यांच्या कृषी विकास योजना लागू करण्यात यावी, तसेच यासाठी जिल्हा खनिकर्म निधीतून विशेष आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार, राहुल कुळमेथे यांनी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे निवेदनातून केली आहे.ह्या आहेत मागण्या:-शहरी भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी, फळतोडणी, वनशेती यासंबंधी प्रशिक्षण देण्यात यावे, एफपीओ (शेतकरी उत्पादक संस्था) आणि सहकारी संस्थांची स्थापना करावी, अन्न प्रक्रिया उद्योग व साठवण केंद्रांची निर्मिती करावी, शीतगृहे व औषधी वनस्पती प्रक्रिया युनिट, जलसिंचन व ठिबक सिंचनाची सुविधा द्यावी, विहिरी व सौरऊर्जा प्रकल्प उभारावे, पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन व मधमाशीपालन यांना प्रोत्साहन द्यावे, शेतकऱ्यांसाठी एटापल्ली शहरात कृषी योजना राबविण्याची मागणी. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीची शिफारस. खाणबाधित, घरविहीन नागरिकांसाठी पक्की घरकुलांची मागणी. एटापल्लीसाठी स्वतंत्र 11 KV विद्युत फिडर व ट्रान्सफॉर्मर बसविणे. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत यासाठी पाठपुरावा, रमाई आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करणे, आदी सुविधा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

नगरपंचायत क्षेत्रातील बहुतांश शेतकरी अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय घटकातील असून त्यांच्याकडे शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री, भांडवल, व तांत्रिक ज्ञानाचा अभाव आहे. या शेतकऱ्यांच्या पारंपरिक पद्धतीमुळेत्यांना फारसे उत्पादन मिळत नाही. परिणामी, या कुटुंबांचे अर्थकारण सदैव संकटात असते. ग्रामीण भागात यासाठी सुरू असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना शहरी कृषी शेतकऱ्यांनाही लागू व्हाव्यात, अशी मागणी केली. या सुविधा उपलब्ध झाल्यास शहरी भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासह ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा निवेदनातून केली आहे.
