Wednesday, September 16, 2026
HomeEtapalliगटटा ग्रामपंचायत क्षेत्रात पेसा कायद्याचे उल्लंघन...

गटटा ग्रामपंचायत क्षेत्रात पेसा कायद्याचे उल्लंघन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

खदानविरोधात आंदोलनाचा इशारा,

गडचिरोली/एटापल्ली,२०२६::- गटटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वटेली गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर खदान व अवैध वृक्षतोडीच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) व स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी कार्यालय, एटापल्ली तसेच तहसील कार्यालय, एटापल्ली येथे सविस्तर निवेदन सादर केले. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

वटेली हे आदिवासी माडिया बहुल गाव असून या गावाला सामुदायिक वनहक्क (CFR) पट्टा प्राप्त आहे. तसेच हे गाव पेसा कायद्यानुसार 5 वी अनुसूचित क्षेत्रात येते. असे असताना ग्रामसभेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे खदान सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याने जंगलाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे.

या खदान प्रकल्पामुळे तेंदू, बांबू, मोह, चारा व इतर वनउपज नष्ट होत असून याचा थेट परिणाम ग्रामस्थांच्या पिढीजात उत्पन्नावर होत आहे. स्थानिकांच्या मते, या वनउपजांमधून दरवर्षी लाखो-कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते, जे पूर्णपणे धोक्यात आले आहे. याशिवाय खदान कामामुळे पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचा धोका निर्माण झाला असून हवा प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे।

तसेच गटटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोहंडी व गुळूनजुर गावांमध्येही खदान सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील कोणत्याही सर्वेक्षण व प्रशासकीय कार्यवाहीस ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला असून अशा सर्व हालचाली तात्काळ थांबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे।

भाकपा व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी समिती गठीत करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित व्यक्ती कोण आहेत, ते कुठून आले आहेत, त्यांचा उद्देश काय आहे व त्यांना कोणाचा पाठिंबा आहे याचा सविस्तर अहवाल द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बेकायदेशीर खदान व वृक्षतोड प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे।

यावेळी भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी स्पष्ट इशारा देताना म्हटले की,

“गटटा ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासींच्या हक्कांवर कुठल्याही परिस्थितीत गदा येऊ देणार नाही. ग्रामसभेची परवानगी न घेता खदान सुरू करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या खदानामुळे आमचे जंगल, वनउपज आणि पिढीजात उत्पन्न संपुष्टात येणार आहे. प्रशासनाने तात्काळ ही बेकायदेशीर खदान बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा भाकपा व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

या वेळी कॉ. सुरज जककुलवार (जिल्हा सदस्य), इतर पक्ष कार्यकर्ते, गटटा ग्रामपंचायत अंतर्गत विविध गावांतील ग्रामस्थ तसेच गटटा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी एकमुखाने या बेकायदेशीर कामांना विरोध दर्शवित प्रशासनाकडून तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी केली।

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular