VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
अखिल भारतीय आदिवसी विकास परिषद गडचिरोली व जंगोरायताड महिला विकास संघटनेची मागणी,
गडचिरोली, ३१ जुलै २०२५::- जुन्नूर विधानसभा क्षेत्राचे आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नूर तालुक्यातील आढावा बैठकीदरम्यान राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक ऊईके यांच्याविषयी अर्वाच्य भाषा वापरल्याच्या प्रकारामुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, गडचिरोली आणि जंगोरायताड महिला विकास संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात, आ. सोनवणे यांनी अनुसूचित जमातीच्या मंत्रीविषयी असभ्य, अवमानकारक आणि द्वेषपूर्ण भाषा वापरून समाजाचा अपमान केला असून, हा प्रकार अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत येतो, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.सोबतच, अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीची आमदारकी राखणे हे लोकशाहीला शोभणारे नसून, त्यांची आमदारकीही रद्द करावी, अशी ठाम भूमिका संघटनांनी घेतली आहे.या निवेदनाद्वारे आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित केला असून, राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा उपाध्यक्ष वामन जुनघरे, उमेश ऊईके, सुरज मडावी, प्रफुल्ल कोडाप, जंगोरायताड महिला संघटनेच्या अध्यक्षा आरती कोल्हे, विद्या दुग्गा, तनुजा कुमरे, लीना कोकोडे, स्मिता नैताम, रोहिणी मसराम, अर्चना टेकाम, मालता पुडो, गीता तुमराम आदी उपस्थित होते.
